कॉल मी मोबाईल हेल्पलाईन च्या
माध्यमातून देशव्यापी अभियानाला नागरिकांचा सकारात्मक पाठिंबा.

एरंडोल ( प्रतिनिधि ) रोजचा ताणतणाव, नैराश्यातून आजचा तरुण आपलं जीवन संपवतो ही बाब अत्यंत चिंताजनक असून हे जीव वाचले पाहिजे. छोट्या मोठ्या संकटांना न घाबरता त्यांना सामोरे गेले पाहिजे. आयुष्यात संकटं ही येतात जातात अश्याप्रसंगी तरुणांनी सकारात्मकता जोपासावी असे आवाहन येथील ऊर्जा एज्युकेशनल काऊन्सिलिंग सेंटरचे समुपदेशक प्रवीण महाजन यांनी केले. त्यांच्या कॉल मी मोबाईल हेल्पलाइनला बारा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी भुसावळ – मुंबई पॅसेंजर मधून नाशिककडे प्रवास करताना हे आयुष्य सुंदर आहे या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी रेल्वेच्या अनेक डब्यांमध्ये जाऊन त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यापूर्वी देखील त्यांनी मुंबई एक्स्प्रेस,सुरत – भुसावळ पॅसेंजर, एस टी बस, लक्झरी बस, पवन एक्स्प्रेस मधून प्रवाशांचे प्रबोधन केले आहे. त्यांच्या या देशव्यापी अभियानाला नागरिकांचा सकारात्मक पाठींबा मिळत असून जीवन नकोसे वाटणाऱ्या प्रत्येकाचा वाचवावा यासाठीच त्यांची प्रामाणिक धडपड आहे. नैराश्य,ताणतणाव असणाऱ्या तरुणांनी कॉल मी मोबाईल भ्रमणध्वनी क्रमांक 9420213848 या हेल्पलाईन वर कौन्सेलर प्रवीण महाजन यांच्याशी संपर्क साधावा. ही हेल्पलाईन 24 तास निःशुल्क सेवा देत असून महाराष्टातील अनेकांचे प्राण वाचविण्यात यशस्वी झाली आहे.या हेल्पलाईन वर आपल मन मोकळं करा….व्यक्त व्हा. आपली माहिती गुप्त ठेवण्यात येईल.