जुनी पेन्शन मिळविण्यासाठी तहसील कार्यालयवर प्रचंड मोर्चा…..सरकार विरोधी घोषणांनी परिसर दुमदुमला..

अमळनेर (प्रतिनिधि) जुनी पेन्शन मिळण्यासाठी अमळनेर तालुका समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तहसिल कार्यालयवर प्रचंड मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले.

सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज

नाट्यगृहापासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाचे नेतृत्व महिलांनी केले होते. प्रत्येकाने डोक्यावर ‘एकच मिशन जुनी पेन्शन’ लिहिलेल्या पांढऱ्या टोप्या घातल्या होत्या. महिलांच्या मागे महसूल कर्मचारी ,तलाठी संघटना पेन्शन चा उल्लेख असलेले टी शर्ट घातले होते. विविध प्रकारच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. मंगलमूर्ती चौक , न्यायालय ,महाराणा प्रताप चौक , बळीराजा चौक मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा आला. त्याठिकाणी सभेत रूपांतर झाले. सभेत उपशिक्षणाधिकारी पवार , महराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील ,कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचे प्रा. भलकार , जुनी पेन्शन संघटनेचे कुणाल पवार , पाकिजा पिंजारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील तर आभार टीडिएफ चे तालुकाध्यक्ष सुशील भदाणे यांनी मानले.
मोर्चात नगरपालिका कर्मचारी संघटना ,सफाई कर्मचारी संघटना , आरोग्य संघटना ,ग्रामसेवक संघटना , सार्वजनिक बांधकाम विभाग , कृषी विभाग ,महसूल कर्मचारी , पंचायत समिती कर्मचारी , जिल्हापरिषद कर्मचारी , ग्रामीण पाणीपूरवठा विभाग , माध्यमिक शिक्षक , मुख्याध्यापक , प्राथमिक शिक्षक ,जिल्हापरिषद शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी ,ग्रंथपाल संघटना , वैद्यकीय संघटना , भूमी अभिलेख , महिला बाळ कल्याण विभाग ,लिपिक संघटनांचे अडीच हजार कर्मचारी सहभागी झाले होते.मोर्चाची रांग एव्हढी लांब होती की प्रत्येक कॉर्नरला ,चौकात पंधरा ते २० मिनिटे वाहतूक खोलम्बत होती. पोलीस निरीक्षक विजय शिंदे , उपनिरीक्षक विकास शिरोळे ,पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे, गोपनीय अंमलदार शरद पाटील ,सिद्धांत शिसोदे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता