एरंडोल नगरपालिकेस गैरसमज थांबविण्यासाठी महावितरणचे पत्र…

.
एरंडोल ( प्रतिनिधी ) एरंडोल शहराचा पाणीपुरवठा हा महावितरणकडून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे विस्कळित होत असल्याची चुकीची माहिती एरंडोल नगरपालिकेकडून नागरिकांना दिली जात आहे. यावर महावितरणने तीव्र आक्षेप घेतला आहे. विनाकारण गैरसमज पसरवणे थांबवा अन्यथा कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास नगरपालिका त्यास सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारा महावितरणने नगर पालिकेस दिला आहे. दरम्यान एरंडोल नगर पालिकेतर्फे शहरातील काही भागात रिक्षांवर ध्वनिक्षेपक लावून पाणीपुरवठ्याबाबत उद्घोषणा करत आहे. त्यात म्हटले आहे की, “सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने व अवकाळी वारावादळामुळे एम.एस.ई.बी. विभागाकडून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे.त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे.त्यामुळे पढील दोन – महीने शहराचा पाणीपुरवठा चार दिवसाआड होणार आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी.” ही बाब महावितरण पर्यंत पोहचताच एरंडोल मुख्याधिकाऱ्यांना उपकार्यकारी अभियंत्यांनी पत्र लिहून यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. पत्रात म्हटले आहे की, महावितरण कुठल्याही परिस्थितीत सर्व ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी कटिबद्ध आहे. महावितरणतर्फे कुठलेही भारनियमन सध्या केले जात नाही. त्याचप्रमाणे कुठल्याही कारणास्तव वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांकडून प्राप्त तक्रारीचे तात्काळ निरसन केले जाते. पाणी ही सुद्धा मानवाची मूलभूत गरज आहे.याची जाणीव महावितरणला आहे. तरी सध्या एरंडोल नगरपालिकेतर्फे ध्वनिक्षेपकाद्वारे प्रसारित होत असलेल्या संदेशात महावितरणकडून वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात आहे.अशी चुकीची माहिती दिली जात आहे. ज्यामुळे जनमानसात महावितरणची प्रतिमा मलिन होत आहे तसेच यामुळे महावितरण व ग्राहकांमध्ये सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होईल आणि त्याचा रोष नागरिक कदाचित महावितरणच्या कर्मचारी अथवा कार्यालयावर काढून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तशी परिस्थिति उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी एरंडोल नगरपरिषद प्रशासनाची राहील याची कृपया नोंद घ्यावी असे निवेदन दिले आहे.