अमळनेरात एकाचा चाकू मारून खून.. – –हत्येच्या निषेधार्थ सुमारे तीन तास रास्ता रोको करून निषेध…

अमळनेर (प्रतिनिधि ) दाजिबा नगर येथील अक्षय भिल याच्या हत्येचा निषेध करण्यासाठी तालुक्यातील भिल्ल समाजाने एकत्र येत आरोपिना

आमच्यासमोर उभे करावे, फाशी द्यावी, एन्काउंटर करावे या मागणीसाठी सुमारे तीन तास रास्ता रोको करून निषेध केला.
मोठमोठ्या संगीतामुळे दाजीबा नगर परिसरात दोन कुटुंबात भांडण होऊन एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान अक्षय राजू भील याचा मृत्यू झाल्याने 25 रोजी सकाळी संतप्त भिल्ल समाजाने शहराच्या कानाकोपऱ्यातून व तालुक्यांमधून एकत्र येत तहसील कार्यालयाजवळ रास्ता रोको केला. हत्येतील आरोपींना आमच्यासमोर हजर करा, असे म्हणत जमाव संतप्त झाला आणि रस्त्याने जाणाऱ्यांवर दगडफेक केली. डीवायएसपी राकेश जाधव, प्रभारी पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, प्रभारी तहसीलदार अमोल पाटील, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेशसिंह परदेशी, पोलिस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, पोलिस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे, पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील, पोलिस उपनिरीक्षक डॉ. शिरोळे यांच्यासह विविध अधिकारी व पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे, हे ऐकूनही जमाव तयार नव्हता. त्यानंतर जमावाने महाराणा प्रताप चौकाचा ताबा घेत तिन्ही बाजूची वाहतूक रोखून धरली. तीन-चार ठिकाणी टायर जाळण्यात आले. विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही आंदोलकांनी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी व त्या कुटुंबाला आमच्या कॉलनीतून हाकलून द्यावे, अशी मागणी केली. अखेर आरोपींना पोलिसांनी अटक केल्याचे चार-पाच जणांच्या शिष्टमंडळाला दाखवून कडक कारवाईची मागणी करत आंदोलन मागे घेतले.