चार महिन्यांपासून मानधन रखडले.. — संगणक परिचालक व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ…

0

अमळनेर (प्रतिनिधि)
तालुक्यातील 118 ग्राम पंचायतीमध्ये सीएससी.एसपीव्ही या खाजगी कंपनीकडून नियुक्त करण्यात आलेल्या संगणक परिचालक यांचे गेल्या चार महिन्यापासून मानधन रखडले असल्याने त्यांना अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
अमळनेर तालुक्यातील सर्व ग्राम पंचायतीमध्ये कार्यरत संगणक परिचालक ग्रामस्थांना विविध सेवा दाखले व ग्राम पंचायतीचे सर्वच कार्यालयीन व ऑनलाईन कामे करतात.त्याबदल्यात सीएससी एसपीव्ही कंपनीकडूज दर महिन्याला सात हजार रुपये मानधन अदा करणे आवश्यक आहे.मात्र कंपनी असे न करता संगणक परीचालकांचे मानधन थांबवून ठेवते.त्यांच्याकडून विना मानधन अनेक प्रकारचे शासकीय योजना व उपक्रमांचे ऑनलाईन कामे करून घेतली जातात.आहे ती नोकरी जाण्याच्या भीतीने शेकडो संगणक परिचालक दबावात राहून दिवस-रात्र कामे करीत असतात.मात्र त्यांच्या हक्काचे व मेहनतीचे पूर्ण मानधन तर सोडाच अर्धे मानधनही गेल्या चार महिन्यांपासून दिले गेले नाही.त्यामुळे पैशाअभावी ‘बिनपगारी, फुल्ल अधिकारी’अशी केविलवाणी अवस्था संगणक परीचालकांची झालेली आहे.
संगणकीय युगामध्ये सामान्य जनतेची कामे गतिमान व पारदर्शक व्हावीत याकरिता सरकारने सन 2014 पासून प्रत्येक ग्राम पंचायतीत संगणक परीचालकांची नियुक्ती केली.कालांतराने संगणक परीचालकांनी आपल्या पदाची गरिमा समजून जबाबदारीने अहोरात्र कार्यालयीन कामे करून ग्राम पंचायतीच्या कामांमध्ये गती व सुसूत्रता आणली.मात्र कंपनी संगणक परीचालकांना दर महिन्याला वेळेवर मानधन अदा न करता पर्वताएवढी कामे काढून घेऊन चार ते पाच महिने मानधनासाठी ताटकळत ठेवते.परिणामी,संगणक परिचालक व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.आजच्या तारखेला संगणक परिचालक हे ग्राम पंचायतीचे महत्वाचे घटक ठरले आहेत.रात्रंदिवस कामे करूनही वेळेवर मानधन मिळत नसल्याने आम्हाला जगणे खूप कठीण झाले आहे.उत्पनाचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने महागाईच्या युगात कसे जगाचे ? हे संकट आमच्यासमोर उभे असल्याचे संगणक परिचालक संघटनेचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र राज्याचे डिजिटलायझेशन व्हावे या उदात्त हेतूने प्रत्येक ग्राम पंचायतीसाठी एक संगणक परिचालक नेमण्यात आलेला आहे.या संगणक परीचालकांचे मानधनापोटी ग्रामपंचायत पंधराव्या वित्त आयोगातून वर्षाची रक्कम कंपनीला वर्ग करते.त्याकरिता दरवर्षी एक लाख रुपयांच्या वर रक्कम ग्राम पंचायतीकडून कंपनीला अदा करण्याचे नियोजन असते.वर्षांची रक्कम वर्ग करूनही संगणक परीचालकांचे मानधन चार चार महिने राखडून आहे.त्यामुळे संगणक परिचालक आक्रमक झालेले दिसून येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!