धुळे मनपात ‘हंडा बजाओ आंदोलन’ करीत सत्ताधारी बीजेपी ला ‘क्या हुवा तेरा’ ? असा थेट प्रश्न..

धुळे (अनिस अहेमद) शहराच्या पाणीपुरवठ्याची काय स्थिती आहे हे आपण जाणूनच आहात. आठ ते बारा दिवस नळांना पाणी येत नाही. जे येते तेही अत्यंत अशुद्ध, गढूळ ब गाळमिश्रित पाणी असते. मात्र नाईलाजाने ह्याच पाण्याचा थेंब न थेंब साठवून धुळेकर जनता आपल्या घशाची कशीबशी कोरड भागवीत आहे. काहींना तेही मिळत नसल्याने त्यांना हंडाभर पाणी मिळविण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. या नरकयातनेचा कधी अंत होईल याकडे भाबड्या आशेने धुळेकर डोळे लावून बसले आहेत. अक्कलपाडा पाणी योजनेचे पाणी आज मिळेल, उद्या मिळेल अशी खासदार डॉ. सुभाष भामरे व मनपातील सत्तेवर कंट्रोल ठेवणारे भाजप शहराध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी दिलेली आश्वासने भूलथापा ठरली आहेत.
भाजपा पक्षातील धुळे लोकसभा खासदार, वरिष्ठ पदाधिकारी फक्त टीव्ही समोर येण्यासाठी जनतेला पाणीपुरवठ्याबाबत खोटी आश्वासने देत आहेत. भैय्या म्हणतात- आठवड्यात दिवसाआड पाणी येईल. बाबा म्हणतात जून महिन्याअखेर पाणी येईल. या सर्वांना त्यांच्या आश्वासनावर इतकाच विश्वास आहे तर त्यांनी आज २० जून २०२३ ला धुळे मनपा आवारात यावे आणि धुळेकर नागरिकांसमोर स्टॅम्प पेपरवर लिहून द्यावे की, की जून महिना अखेर आम्ही धुळेकर जनतेला एक दिवसाआड पाणी देवूच. आणि जर नाही लिहून देत असाल तर मान्य करावे की धुळे भाजपा धुळेकर जनतेला फक्त थापा मारीत आहे असे खुले आवाहन आम्ही त्यांना केलेच आहे. मुळात या योजनेत भ्रष्टाचाराचे पाणी मुरलेले आहे. योजनेचा उदो-उदो करीत असलेल्या सत्ताधाऱ्यांनी या कामाचे ठेकेदार घुले यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर कमिशन लाइन भ्रष्टाचार केलेला आहे. हे भ्रष्टाचाराचे पाप लपविण्यासाठी पाणी देण्याच्याआश्वासनाच्या पिपाण्या सत्ताधारी वाजवीत आहेत. सत्ताधाऱ्यांना कमिशनने मढविणाऱ्या ठेकेदाराने योजनेचे काम कुठे व कशा पद्धतीने केले आहे हे मनपातील अधिकाऱ्यांनाही माहित आहे. मात्र प्रशासनातही अत्यंत सुस्तपणा आहे. नवीन काम असलेल्या या पाईपलाईनला गळती लागली हे तर नवलच म्हणावे लागेल. यावरूनच कामाचा दर्जाही स्पष्ट होतो. योजनेत भ्रष्टाचार बोकाळल्याने ठेकेदाराने हे काम थातुरमाथुर पद्धतीने केले आहे. कुठे-कुठे व्हॉल्ब आहेत. कशाचा कशाशी ताळमेळ लागत नाही. सत्ताधारी व प्रशासनात समन्वय दिसून येत नाही. प्रशासन या योजनेची खरी परिस्थिती जनतेसमोर मांडत नाही. जनतेच्या अत्यंत महत्वाच्या पाणीप्रश्नावर आपले प्रशासनही ढिम्म आहे. म्हणूनच सत्ताधाऱ्यांचे फावते. सत्ताधाऱ्यांच्या आश्वासनांवर भोळीभाबडी जनता आस लावून जगत आहे. प्रशासनाला पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याची इच्छाशक्तीच राहिलेली नाही. म्हणूनच नकाणे, हरणमाळ या तलावांमध्ये पाणीसाठा असूनही आठ-आठ, दहा-दहा दिवस नागरीकांना पाण्यासाठी वाट पहावी लागते. धुळेकर जनतेने अजून पाण्यासाठी किती हाल सोसावे? या उद्दिप्र जनभावनेला वाट मोकळी करून देत आम्ही आज मनपात ‘हंडा बजाओ आंदोलन’ करीत सत्ताधारी बीजेपी ला ‘क्या हुवा तेरा’ ? असा थेट प्रश्न विचारत आहोत. “एक दिवसाआड नियमित पाणी द्या, नाही तर राजीनामा द्या, धुळे मनपाची सत्ता लोक सेवेसाठी आहे, फक्त एअरकंडीशन मध्ये बसण्यासाठी नाही. हाच सवाल धुळेकरांच्या वतीने आम्ही आपणास विचारीत आहोत. हे आंदोलन एकट्यादुकट्याचे नसून धुळेकर जनतेचे, मायमावल्यांचे आहे. हा जनभावनेचा आवाज आहे. हीच भावना आम्ही अलीकडेच मनपा प्रवेशद्वारासमोर बॅनर लावून व्यक्त केली तर ते बॅनर दादागिरी करून काढून टाकत जनभावनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. जनतेच्या प्रश्नांवर बोलायचे नाही का? ही तर हुकूमशाही आहे. बॅनर हटवून जनतेचा आवाज दाबला जाणार नाही तर तो तितक्याच तीव्रतेने आज उफाळून आलेला आहे. या आंदोलनात प्रचंड मोठ्या संख्येने पुरुषांसह धुळे शहरातील कानाकोपऱ्यातून महिला सहभागी होऊन पाण्याची याचना करीत आहेत. द्या…त्यांना जगण्यासाठी पाणी द्या. पाण्यावाचून लोकांना तडफडून मरणाची वाट तुम्ही पाहत आहात का? आम्ही बेंबीच्या देठापासून आर्त विनवणी करतोय. माणुसकी धर्माला तरी जागा.. ‘पाणी द्या… पाणी द्या…’ आजचे आमचे हे आंदोलन झाल्यानंतर आम्ही मनपातील जिन्याजवळ एक नळ
जोडलेला पाण्याचा हंडा ठेवणार आहोत. या हंड्याची दररोज आंदोलनाचे प्रतिनिधी येऊन अगरबत्ती लावून पूजा करतील. जोपर्यंत आपण एक दिवसाआड पाणी देत नाहीत तोपर्यंत हा हंडा उचलण्यात येणार नाही याची दखल घ्यावी, ही नाइलाजाची विनंती.
भाजपा सत्ताधारी व मनपा प्रशासनाने प्रिंटींग प्रेस यांच्यावर दबाव टाकून पाणी आंदोलनाचे बॅनर छापू नये अशा धमक्या दिल्या आहेत. परंतु जरी बॅनर छापले गेले नाहीत. तरी आम्ही रात्री पालिका प्रशासनाच्या दारावर पेरींग करून आमचा निषेध नोंदविला आहे. आपण तेही खोडून काढले तर आपल्या घरांच्या ग्राहूनही तीव्र निषेध आम्ही नोंदवू याची नोंद घ्यावी.
हे आंदोलन कुण्या एका पक्षाचे नसून सर्व धुळेकर जनतेचे आहे… यावेळी आझाद समाज पार्टी चे प्रदेश कार्याध्यक्ष आनंद लोंढे, समाज समता संघाचे किरण गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे शंकर खरात, रिपाईचे नैनाताई दामोदर, सामाजिक युवा कार्यकर्त्या पूनमताई शिरसाठ, अनिल ठाकूर, रोहीत सोनवणे, बिकी लोंढे, अमोल शिरसाठ, निलेश जिरे, संगीता पाटील, महीला भगिनी, युवक आणि शहरातील महिला भगिनी हंडा घेवून मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. हे आंदोलन येथेच थांबणार नसून लवकरच साखळी उपोषण सुरु केले जाईल..