वडिलांचे खाकी वर्दी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण करणारी माधुरीचा सत्कार सोहळा थाटात..

अमळनेर(प्रतिनिधि) तालुक्यातील वासरे येथील कु. माधुरी मधुकर पाटील हीची पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल वासरे तेथे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील विविध मान्यवरांनी हजेरी लावत कु. माधुरी हीचा सत्कार केला.
वासरे येथील दिवंगत प्रगतशील शेतकरी मधुकर शेनपडू पाटील (दादाभाऊ) यांची कन्या असलेल्या माधुरी हिने तिचे वडिलांचे खाकी वर्दी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण केले असून तिची पीएसआय पदी निवड झाल्याने दिनांक १५ जुलै रोजी तिचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी डिजेच्या सोबतीने तिची चारचाकी वाहनातून गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमस्थळी तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी माजी आ. स्मिता वाघ, जि.प. सदस्या जयश्री पाटील, पीआय विजय शिंदे, बाजार समिती सभापती अशोक पाटील, संचालक प्रा.सुभाष पाटील, डॉ. अनिल शिंदे, सुरेश पाटील, तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, ॲड. ललिता पाटील, मा. कृ.ऊ.बा. प्रशासक तिलोत्तमा पाटील, सुलोचना पाटील, जितेंद्र राजपूत, प्रताप शिंपी, हभप प्रदीप महाराज यांच्यासह कळमसरे येथील शिक्षक वृंद व मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी ॲड ललिता पाटील यांनी बोलताना सांगितले की, “दादाभाऊ हयात असते तर त्यांना खूप आनंद झाला असता तसेच त्यांचा वारसा कु. माधुरी ही समर्थपणे चालवेल.” जयश्री पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “यश एका दिवसात मिळत नसते, त्या यशामागे अनेक अपयश आणि अनेक दिवसांची मेहनत लपलेली असते.” पी आय शिंदे यांनी सपत्नीक कु. माधुरी हीचा सत्कार केला. त्यानंतर अशोक पाटील, डॉ. अनिल शिंदे, जी. टी. टाक, जयवंतराव पाटील यांनी ही मनोगत व्यक्त केले. सत्कारमूर्ती कु. माधुरी हिने याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, “वडिलांचे स्वप्न, आईचा पाठिंबा, आणि मेहुणे नितीन पाटील यांचे मार्गदर्शन या त्रिसूत्रीमुळे मला यश मिळाले असून आज वडील हयात असते तर त्यांना खूप आनंद झाला असता व अभिमान वाटला असता. ते आज इथेच असल्याचे मला भासत असून त्यांचे स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद असला तरी ते हयात असते तर या आनंदाला पारावार उरला नसता.” यावेळी उपस्थित मान्यवर, आप्तेष्ट व ग्रामस्थांनी कु. माधुरीचा सत्कार करत कौतुक केले.