पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे ७७ वा स्वातंत्र्यदिन “आझादी का अमृतकाळ महोत्सव “उत्साहात साजरा !

एरंडोल ( कुंदन सिंह ठाकुर) सर्व भारतीयांसाठी गौरवशाली राष्ट्रीय सण , १५ ऑगस्ट ह्या स्वातंत्र्य दिनाचे जळगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शाळेचे उपप्राचार्य दीपक भावसार यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून परिचय करून दिला . शर्मिष्ठा पाटील,शौर्य मेहता,केंश पटेल आणि केना लकडावाला या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले.
मा. ऋषिकेश पेंडसे(मुख्य कार्यकारी अधिकारी ,एल एल सी एफ झेड ,दुबई) हे प्रमुख पाहुणे तसेच मा. रामराज आहिरे (नायब सुबेदार ई एम ई कोर्पस ,भारतीय सेना )हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व उपस्थितांनी मानवंदना दिली.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक ७.३५ वाजता राष्ट्रगीताने करण्यात आली. शाळेचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख वैभव काकड यांनी संचालनाचे आदेश दिले. शाळेतील शिक्षकांनी राष्ट्रागीता पाठोपाठ ध्वजगीत सादर केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी बहारदार स्वागत नृत्य प्रस्तुत केले.थोर भारतीय स्वातंत्र्य वीरांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत वातावरण जाल्लोषित केले.देशभक्ती म्हणजे नेमके काय ,या विषयावर आधारित लघुनाटिका विद्यार्थ्यांनी यावेळी प्रस्तुत केली. तसेच देशभक्तीपर समूहगीत सादर केले.कु.मृण्मयी मोरे हिने आपल्या भाषणातून स्वतंत्र भारतीय नागरिकांकडून भारतमातेच्या असलेल्या अपेक्षा उपस्थितांसमोर मांडल्या व देशसेवेसाठी प्रत्येक भारतीयाने सदैव तत्पर असावे असा संदेश दिला.विर शहा या विद्यार्थ्याने आपल्या भाषणातून स्वातंत्र्यवीरांची रोमांचकारी शौर्यगाथा उलगडली.’देश सर्वप्रथम’ या आशयाला अनुसुरून सादर केलेल्या पथनाट्याला उपस्थितांची दाद मिळाली.कु. विहा संघवी हिने आपल्या भाषणातून भारतीय संस्कृती आणि परंपरांची महती सांगितली.
८ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट या आठवड्यात शाळेत विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे वितरीत करण्यात आली.याच पाठोपाठ शिक्षण व क्रीडा प्रकारात शाळेचा मान उंचावणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.यावेळी शाळेच्या शिक्षक पालक संघाचे प्रतिनिधी व पालक उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक गोकुळ महाजन यांनी प्रमुख पाहुण्यांचे तसेच शिक्षक पालक संघाच्या प्रतिनिधींचे स्वागत केले. आपल्या भाषणातून पालक व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनी “भारत का अमृतकाळ महोत्सव ‘ ७७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांना संबोधित करतांना देशातील लक्षवेधक चद्रयान मोहीम, जनाभागीदारी योजना ,पंचप्राण शपथ ,जी -20 प्रतीनिधीत्व ई. मोठ्या घडामोडीबद्दल माहिती दिली.तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षणात ,स्पर्धा परीक्षांमध्ये आणि विविध क्षेत्रांमध्ये मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक व अभिनंदन केले.
मा. ऋषिकेश पेंडसे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आपल्या शैक्षणिक जीवनापासून ते यशस्वी उद्योजक यामधील प्रवास उलगडत भारताच्या मेक इन इंडिया या उपक्रमातून प्रेरणा घेतल्याचे ते म्हणाले. शाळेच्या गुणवंत विद्याथ्यांना त्यांच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या.
नायब सुबेदार रामराज आहिरे यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात सैनीकांचे स्मरण करून १९६२ व १९७२ च्या युद्धात प्राणांची बाजी लावणाऱ्या सैनिकांच्या अतुलनीय शौर्याची गाथा मांडली.युद्धात टिकून राहण्यसाठी व विजय मिळविण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने व एकसंघ वृत्तीने काम करण्याची गरज असते असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी शाळेचे उपप्राचार्य दिपक भावसार,पोदार प्रेपच्या मुख्याध्यापिका उमा वाघ ,शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
आभारप्रदर्शन कु. हरमायनी शिरसाठ हिने केले.