कांद्यावर ४० टक्के निर्यात कर..

24 प्राईम न्यूज 20 Aug 2023 भाज्यांनी देशात महागाईचा कहर केलेला असतानाच कांदाही त्याच मार्गाने निघाला होता. कांद्यावरून सरकार पडल्याचा इतिहास असल्याने केंद्रातील भाजप सरकारने आता महागाईबाबत सावधतेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. देशात यंदा होणाऱ्या विधानसभा व पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेता कांद्याच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने शनिवारी कांद्यावर ४० टक्के निर्यात कर लावला आहे. केंद्रीय अर्थखात्याने याबाबतची अधिसूचना काढली आहे. हा निर्यात कर ३१ डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहे.
कांद्याच्या दरवाढीमुळे १९९८ मध्ये दिल्लीतील भाजपचे सरकार पडले होते. त्यामुळे कांदा हा राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. सप्टेंबरपासून कांद्याच्या दरात वाढ होणार असल्याच्या बातम्या येत असल्याचे अहवाल पतमान संस्थांनी दिले होते. त्यामुळे सरकारने कांद्याचे दर नियंत्रणात राखण्यासाठी आक्रमक पावले टाकली आहेत.