दोस्ती पाहिली, आता मशालीची आग पहा !
उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

जळगाव ( प्रतिनिधी) जळगाव महापालिकेत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे तसेच शिवरायांच्या पुतळ्याच्या भूमिपूजन प्रसंगी व पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी बोलताना ठाकरे म्हणाले, “शब्द खाली पडू द्यायचा नाही, ही शिकवण आहे. म्हणून आज मी आलो. निवडणुका आल्या की काहींना सभा घ्याव्या लागतात. भाड्याने गर्दी जमवावी लागते. डोक्यात हवा गेलेले काही लोक फुग्यासारखे तरंगू लागले आहेत, त्यांना टाचणी मारण्याची गरज आहे. तो फुगा तुम्ही निवडणुकीत फोडायचा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सभेला सांगितले.आमच्यावर सातत्याने टीका होते, शिवसेनेची काँग्रेस होणार, पण
गेल्या २५ वर्षांत शिवसेनेची भाजप झाली नाही, मग ती काँग्रेस कशी होईल, असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर जोरदार टीका केली. त्यांनी आमची दोस्ती कशी असते हे पाहिले, आता मशालीची आग पहा, असा इशारा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी येथे दिला.सगळे देशप्रेमी पक्ष एकत्र झाल्यानंतर इंडिया नाव आलं, मात्र यानंतर या नावाची भीती वाटायला लागली. मग आता पक्ष फोडायचा कारभार सुरू केला. त्यानंतर आता इंडिया नावच बदलायचा घाट घातला जात आहे, पण आम्ही इंडिया, भारत, हिंदुस्थान बोलणारच. ते उद्या स्वतःचं नावही देशाला देऊन टाकतील, पण आम्ही नाव बदलणार नाही, तर पंतप्रधान बदलणार, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.