आता जन्मदाखला ठरणार बंधनकारक.
-ऑक्टोबरपासून कायदा लागू, केंद्राकडून अधिसूचना जारी

24 प्राईम न्यूज 15 Sep 2023 केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार येत्या १ ऑक्टोबर २०२३ पासून जन्मदाखला संपूर्ण देशात अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज होणार आहे. अगदी शालेय प्रवेशापासून आधार कार्ड काढण्यापर्यंत प्रत्येक सरकारी कामासाठी आता जन्मदाखलाच महत्त्वाचा दस्तावेज ग्राह्य धरला जाणार आहे.
केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार १ ऑक्टोबर २०२३ पासून याबाबतचा कायदा अंमलात येणार आहे. ज्याअन्वये राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर जन्म, मृत्यू संबंधित डेटाबेस तयार करण्यात येणार आहे. यामुळे सार्वजनिक सेवा, सामाजिक लाभ आणि डिजिटल नोंदणी या सर्व कामांमध्ये पारदर्शकता येऊन विविध सरकारी कामांची कार्यक्षमता वाढणार आहे.
अधिसूचनेनुसार जन्म व मृत्यू नोंदणी सुधारणा अधिनियम २०२३ येत्या १ ऑक्टोबर २०२३ पासून अंमलात येईल. कायद्यानुसार शालेय प्रवेश, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार यादी, आधार नोंदणी,विवाह नोंदणी, सरकारी नोकरी नियुक्ती आणि केंद्र सरकारने ठरवलेले अन्य हेतू यासाठी जन्मदाखला हाच मूलभूत दस्तावेज मानला जाणार आहे.