राष्ट्रवादीत सर्वोच्च लढाई, आज होणार सुनावणी.

24 प्राईम न्यूज 9Oct 2023 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर पक्ष आणि चिन्हाचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात गेला असून यावर शुक्रवारी पहिली सुनावणी झाली. या सुनावणी आधीच शरद पवार गटाने मोठी खेळी करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटातील आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी आज सोमवारी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडूनही सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करत आमचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये, अशी विनंती न्यायालयाला केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत सुरू असलेल्या या सर्वोच्च लढाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगातही आज सुनावणी
राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाच्या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगात शुक्रवारी सुनावणी झाली होती. या सुनावणीला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः उपस्थित होते. पहिल्या सुनावणीत अजितदादा गटाकडून २ तास युक्तिवाद करण्यात आला. या युक्तिवादात प्रामुख्याने शरद पवार यांच्या अध्यक्षपदाला आव्हान देण्यात आले. तसेच पक्ष शरद पवारांच्या एकाधिकारशाहीने चालत असल्याचाही दावा करण्यात आला. शरद पवार गटाने मात्र हे सर्व दावे जोरकसपणे फेटाळून लावले. पक्षातून केवळ एक गट फुटून बाहेर पडला असून अंतिम निकाल येईलपर्यंत निवडणूक चिन्ह गोठवू नये, अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली. आजच्या सुनावणीत शरद पवार गटाला युक्तिवाद करण्याची संधी मिळू शकते.