जयंत पाटील अजितदादा- फडणवीसांच्या गळाला ?

24 प्राईम न्यूज 11 Oct 2023 सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि विधिमंडळात कायदेशीर लढा सुरू असतानाच अजित पवार गटात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या गळाला ते लागण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. या शक्यतेला पुष्टी देताना अनेक राजकीय कारणांबरोबरच ईडीच्या एका नोटीसनंतर पुढे थांबलेल्या हालचाली, हेही कारण सांगितले जाते.
अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही काही नेते राष्ट्रवादीत दाखल होणार असल्याचा मंगळवारी दावा केला आहे. शरद पवार यांच्याराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गेल्या काही महिन्यांपासून समन्वयवादी भूमिका घेतल्याचे दिसून येते. अजित पवारांच्या बंडानंतर पुण्यात एका उद्योगपतींच्या निवासस्थानी शरद पवार व अजित पवार यांच्यात झालेल्या संयुक्त बैठकीतही पाटील यांची भूमिका महत्त्वाची होती. ती बैठक निष्फळ ठरली होती. पुत्र प्रतीकचे राजकीय पुनर्वसन !
जयंत पाटील गळाला लागल्याच्या कारणात त्यांचे पुत्र प्रतीक यांच्या राजकीय पुनर्वसनाचे कारणही सांगितले जाते. स्वर्गीय आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित यांच्याकडे तासगाव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार म्हणून पाहिले जाते. या पार्श्वभूमीवर चिरंजीव प्रतीक यांच्या राजकीय पुनर्वसन व भवितव्यासाठी जयंत पाटील गळाला लागू शकतात, असे सांगितले जाते. काही महिन्यांपूर्वी जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आली होती. त्या नोटीसला पाटील यांनी उत्तरही दिले होते. त्यानंतर थांबलेली कारवाई, हे देखील एक कारण सांगितले जाते.