दहावीची १ मार्चपासून बारावी २१ फेब्रुवारीला..

24 प्राईम न्यूज 2 Nov 2023
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बुधवारी दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ ते २३ मार्च २०२४ या कालावधीत होईल, तर दहावीची लेखी परीक्षा १ मार्च २०२४ ते २६ मार्च २०२४ या कालावधीत पार पडणार आहे. दहावी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार १० फेब्रुवारी २०२४ ते गुरुवार २९ फेब्रुवारी २०२४ आणि १२वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार २ फेब्रुवारी ते मंगळवार २० फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या कालावधीमध्ये आयोजित केलेले फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर २ नोव्हेंबरपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.