‘एटीएस’नं केरळात जाऊन आरोपीच्या आवळल्या मुसक्या; मुंबई विमानतळ उडवून देण्याची दिली होती धमकी..

24 प्राईम न्यूज 25 Nov 2023
दहा लाख डॉलर्स दिले नाहीत तर येत्या ४८ तासांत मुंबईतील छत्रपती शिवजी

महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनस दोनमध्ये भीषण बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देणारा मेल पाठविणाऱ्या आरोपी तरुणाला केरळ येथून मुंबई एटीएसच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी अटक केली आहे. त्याला पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याच गुन्ह्यात त्याला शनिवारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. विष्मय अखिलेश पाठक हे अंधेरी येथे राहत असून आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एमआयएएल कंपनीत कामाला आहेत. फ्लाइटसंदर्भातील माहितीसह प्रवाशांच्या तक्रारी कंपनीच्या अधिकृत ई-मेल आयडीवर प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या तक्रारीचे निवारण केले जात होते. गुरुवारी सकाळी आठ वाजता अज्ञात व्यक्तीने मेलवरून एक मिलियन डॉलर्सची मागणी केली होती. ही रक्कम त्याला बीटकॉईनच्या माध्यमातून हवी होती. खंडणीची रक्कम दिली नाही तर येत्या ४८ तासांत टर्मिनस दोनमध्ये बॉम्बस्फोट घडविणार असल्याची धमकी त्याने मेलवरून दिली होती. या घटनेनंतर सहार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. हा तपास सुरू असताना धमकीचा मेल केरळ येथून आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या पथकाने केरळ येथून एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने खंडणीची मागणी करून बॉम्बस्फोट घडविणार असल्याचा मेल पाठविल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अटकेनंतर त्याचा ताबा सहार पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे.