मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द, उद्धव ठाकरेंवरही नारायण राणेंप्रमाणे कारवाईची शक्यता.

24 प्राईम न्यूज 29 Nov 2023 उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून वापरलेल्या नालायक या शब्दामुळे आता गहजब

निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर ज्या प्रकारे कारवाई करण्यात आली होती तेच निकष उद्धव ठाकरे यांनाही लावून कारवाई करता येऊ शकते का, याची चाचपणी करण्यात येणार आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याची ऑडिओ-व्हिडीओ क्लिप मागविण्यात आली आहे. कायदेतज्ज्ञ आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याशी चर्चा करून पुढचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. नारायण राणेंना जो निकष लावण्यात आला होता तोच निकष जर उद्धव ठाकरेंना कायदेशीरदृष्ट्या लावण्यात आला तर उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी परराज्यातील निवडणुकीच्या प्रचाराला गेलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर शेलक्या शब्दांत टीका केली होती. जी व्यक्ती आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना मदत करत नाही व दुसऱ्या राज्यात जाऊन प्रचार करते अशी व्यक्ती राज्य चालवायला नालायक असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत