तापी पात्रातून अवैध वाळू चोरी पुन्हा सुरू !
खोदलेली चारी चोरट्यांनी मातीने बुजवली

अमळनेर/ प्रतिनिधि

तापी काठावर धावडे गावांच्या नदीच्या वाळू पात्रातून पुन्हा मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा होत असून वाळू चोरांनी रस्त्यात खोदलेली चारी पुन्हा बुजून अवैध वाळू वाहनांचा मार्ग मोकळा केला आहे. महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
मोठ्या प्रमाणात वाळू उपशामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होऊन भविष्यात आम्हा गावकऱ्यांना पाण्याची झळ बसण्याची शक्यता असल्याची संतप्त भावना ग्राम दक्षता समितीचे अध्यक्ष तथा सरपंच अँड. उमाकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
धावडे हे सावखेडा हुन तीन किलोमीटरच्या अंतरावर असून अमळनेर व धरणगाव कडील अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर हे रात्र रात्र धावडे येथील नदीच्या वाळू पात्रातून हजारो ब्रास वाळूची अवैधरीत्या चोरी करत आहेत.वाळू चोरीमुळें नदीत अक्षरशः मोठं मोठे खड्डे झाले आहेत. मागे महसूल कर्मचाऱ्यांनी धावडे येथील नदी पात्रात जाणाऱ्या रस्त्यावर जेसीबीच्या साहाय्याने चारी खोदली होती मात्र वाळू चोरट्यांनी सदर चारी मातीने बुजवून टाकली आहे त्यामुळे त्यांचे वाहतूकीचे ट्रॅक्टर पुन्हा सुसाट सुरू आहेत.ग्राम पंचायत मध्ये स्थापन असलेल्या ग्राम दक्षता समितीने वाळू चोरीचा मुद्दा वारंवार महसूल विभागाला कळविला आहे. पंधरा दिवसांपूर्वी अवैध वाळू वाहतुकीचा ट्रॅक्टरचा पुरावा म्हणून व्हिडीओ महसूल कर्मचार्यांना दिला , पोलीस पाटील आणि कोतवाल यांनी ट्रॅक्टरही पकडून ठेवले तरी कोणीच दखल घेतली नाही. ग्राम दक्षता समितीचे कुणी ऐकत नसल्याचा आरोप खुद्द समितीच्या अध्यक्षांनी केला आहे. बेसुमार वाळू चोरीमुळें भविष्यात आम्हा नदी काठच्या गावांना देखील पिण्याच्या पाण्याची झळ बसू शकते म्हणून महसूल विभागाने ह्या अवैध वाळू वाहतुकीचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी सरपंच अँड.उमाकांत पाटील यांनी केली आहे.