पारोळा बसस्थानक परिसराची होणार कायापालट. -आमदार चिमणराव पाटील यांचा अथक प्रयत्नांतुन दीड कोटी मंजूर..

पारोळा /प्रतिनिधी
पारोळा – आमदार चिमणराव पाटील यांच्या अथक प्रयत्नांतून येथील बसस्थानक परिसराचा काँक्रिटीकरणासाठी दिड कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असुन या कामाचा भव्य भुमीपुजन सोहळा उद्या दि २६ रोजी करण्यात येणार आहे.
सदर सोहळा हा मंगळवारी सकाळी दहा वाजता बस स्थानक परिसरात आयोजित केला असुन उद्घाटन आ.चिमणराव पाटील यांच्या शुभहस्ते तर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तथा पारोळा कृ उ बा समितीचे माजी सभापती अमोल पाटील,जळगांव रा.प.विभाग नियंत्रक भगवान जगनोर, विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा,रा.प.विभागीय अभियंता निलेश पाटील,नाशिक रा.प.कार्यकारी अभियंता नागेश कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. दरम्यान,गेल्या अनेक वर्षापासून पारोळा बस स्थानक परिसराच्या प्रश्न हा प्रलंबित होता, या परिसरात अनेक मोठमोठे खड्डे होते,हे खड्डे अनेक वेळा मुरूम टाकून तसेच डागडुजी करूनही मात्र समस्या कायम होती. पावसाळ्यात या बस स्थानकाच्या परिसरात नागरीकांना पायी चालणेही जिकरीचे होत होते तर नेहमी बस चालकास,बस स्थानकापर्यंत नेण्यासाठी देखील तारेवरची कसरत करावी लागत होती,अशा या गंभीर समस्येची आमदार चिमणराव पाटील यांनी दखल घेत हा प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याने त्यांचे नागरिकांकडून आभार व्यक्त होत आहे.