कोरोना वाढत चाललाय !
राज्यात जेएन. १ सब व्हेरियंटचे ९ रुग्ण,

24 प्राईम न्यूज 25 Dec 2023 रविवारी राज्यात कोरोना विषाणूच्या जेएन. १च्या सब व्हेरियंटच्या आणखी ९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात ठाणे महापालिका हद्दीत ५, पुणे महापालिका हद्दीत २, पुणे जिल्हा आणि अकोला महापालिका हद्दीत प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे. राज्यात रविवारी ५० नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. कोरोनाचा विळखा वाढत असल्याने आरोग्य यंत्रणांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. देशात जेएन.१ या उपप्रकाराचा पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला होता.
त्यानंतर या उपप्रकाराचे गोव्यात काही रुग्ण आणि महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक रुग्ण आढळला होता.सिंधुदुर्गमधील रुग्ण हा ४१ वर्षांचा पुरुष होता. आता जेएन. १ चे आणखी ९ रुग्ण सापडले आहेत. सर्वाधिक ५ रुग्ण ठाणे महापालिका हद्दीत आढळले आहेत. या रुग्णांमध्ये ८ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. त्यात ९ वर्षांचा एक मुलगा, २१ वर्षांची महिला, २८ वर्षांचा पुरुष आणि इतर रुग्ण ४० वर्षांवरील आहेत. केवळ पुण्यात आढळलेल्या एका रुग्णाने परदेशवारी केली असून तो अमेरिकेहून परतल्याचे समोर आले आहे.