दमदाटी करणे हाच अजित पवारांचा स्वभावदोष.. -जितेंद्र आव्हाड यांची टीका

24 प्राईम न्यूज 28 Dec 2023. कुणालाही दमदाटी करणे, हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा स्वभावदोष आहे. तुला निवडणुकीत पाडून दाखवतो, अशी वक्तव्ये सार्वजनिक जीवनात करणे योग्य नाही. अजित पवार मोठे नेते आहेत आणि ते कुणालाही पाडू शकतात. तसेच लोकसभेच्या ४८ च्या ४८ जागा निवडून आणू शकतात, अशी उपरोधीक टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना पाडणार असल्याचे विधान केले आहे. अजित पवारांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात टीका-प्रतिटीका सुरू झाली आहे. याविषयी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. कुणालाही दमदाटी करणे हा अजित पवारांचा स्वभावदोष आहे. शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटर येथे कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू असताना ‘ए गप्प बस रे’, ‘उठू नको’ असे अजित पवार दरडावत होते. तुम्ही घरी नसून सार्वजनिक जीवनात आहात. त्यामुळे अशी विधान करणे योग्य नाही, असा सल्ला आव्हाड | यांनी अजित पवार यांना यावेळी दिला.