तुम्हाला भीती वाटणारी सत्ता उलथवून टाका- -उद्धव ठाकरे

24 प्राईम न्यूज 30 Dec 2023. सत्तेला घाबरणार असाल, तर काहीच उपयोग नाही, पण ज्या सत्तेची तुम्हाला भीती वाटते ती सत्ता बदलल्याशिवाय पर्याय नाही, ती उलथवून टाकलीच पाहिजे, अशा शब्दांत शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी कार्यकर्त्यांना भाजपच्या विरोधात ताकदीने लढण्याचे आवाहन केले. नवे वर्ष आणि त्याही! पुढील वर्षे ही संपूर्ण देशाला आनंदाची, उत्साहाची आणि भरभराटीची आणि लोकशाहीची जावो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. पुढील वर्ष हे निवडणुकीचे वर्ष आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे, असे म्हणाले.
जळगावच्या पाचोरा येथील शिंदे गटासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी ठाकरे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी कार्यकत्यांच्या हातात शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत करताना शिवसेना खासदार संजय राऊत, पाचोऱ्यातील नेत्या वैशाली पाटील उपस्थित होत्या. ज्या सत्तेची भीती वाटते ती सत्ता बदलल्याशिवाय पर्याय नाही. ती बदललीच पाहिजे. त्या जिद्दीनेच मी उभा आहे. सत्ता ही प्रत्येक सामान्य माणसाला आपली वाटली पाहिजे, पण त्या सत्तेची भीती वाटत असेल, तर अशी सत्ता उलथवलीच पाहिजे आणि ती उलथवण्यासाठीच आपण काम करीत राहू, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.