प्रताप महाविद्यालय परिसरातही रंगरंगोटी, सुशोभिकरणासह जय्यत तयारी.. -सुरुसंमेलनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहराचा कायापालट करण्यात येत आहे.

0

अमळनेर/ प्रतिनिधि

अमळनेर येथे होत असलेले ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपले आहे. संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या संमेलनाला भव्यदिव्य करण्यासाठी मराठी वाङ्‌मय मंडळ, अमळनेरतर्फे संमेलनस्थळी तीन सभागृह उभारण्यात आले आहेत. सभामंडप क्र. १ला खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी सभागृह, सभामंडप क्र. २ ला कविवर्य ना. धों. महानोर सभागृह, तर सभामंडप क्र. ३ ला बालकवी – त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृह असे नाव देण्यात आले आहे. सभामंडप क्र.१ हे ‘जर्मन हँगर’ पद्धतीचे भव्य असे सभामंडप असून त्यात सुमारे १० हजार लोकांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. संमेलानाचा उत्साह संपूर्ण अमळनेर शहरात दिसून येत आहे. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहराचा कायापालट करण्यात येत आहे. प्रताप महाविद्यालय परिसरातही रंगरंगोटी, सुशोभिकरणासह जय्यत तयारी सुरु आहे. मंडप उभारणी, प्रवेशद्वारासह इतर कामे पुर्णत्वाकडे आली आहेत. प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर सुमारे सात ते दहा हजार प्रेक्षक बसतील, अशा ‘जर्मन हँगर’ पद्धतीचा भव्य असा सभामंडप उभारण्यात येत आहे. यामध्ये सुमारे १५० बाय ३२५ फूट अशा भव्य मंडप उभारण्याच्या कामाला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे.

संमेलनस्थळी प्रवेश करण्यासाठी महाविद्यालयासमोर भव्य व आकर्षक प्रवेशव्दार उभारण्यात आले आहे. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज, संत सखाराम महाराज, पूज्य साने गुरुजी, बहिणाबाई चौधरी, श्रीमंत प्रताप शेटजी यांच्या प्रतिमा आहेत. याशिवाय संपूर्ण महाविद्यालय परिसरातील भिंतींवर आकर्षक चित्रे काढण्यात आली आहे.
पूज्य साने गुरुजी साहित्य नगरीत उभारण्यात आलेल्या सभामंडप क्र. १ खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी सभागृहात ७ ते १० हजार लोकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या मंडपात ८० बाय ५० फूटांचे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. त्याची जमिनीपासूनची उंची ६ फूट आहे. हे सभामंडप जर्मन हँगर पद्धतीने उभारण्यात आले आहे. हे संपूर्ण सभामंडप वॉटरप्रूफ आहे. विशेष बाब म्हणजे, इतक्या मोठ्या मंडपात एकही खांब नाही.

सभामंडप क्र. २ कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात अंदाजे ५०० जणांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. तर सभामंडप क्र. ३ बालकवी – त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृहातही अंदाजे ५०० जणांची बैठक व्यवस्था असेल. हे संभामंडप प्रताप महाविद्यालयातील जुन्या नाट्यगृहात आहे. बी. फार्मसी महाविद्यालयाजवळ ३०० ग्रंथदालने उभारण्यात आली आहे. यात खवय्यांसाठी काही दालने राखीव ठेवण्यात आली आहे. याच परिसरात प्रकाशन कट्टा व सेल्फी पॉईंट देखील उभारण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!