आता आरक्षण कधी मिळणार ते मुख्यमंत्र्यांना विचारा. – राज ठाकरे..

24 प्राईम न्यूज 28 Jan 2023. मनोज जरांगे-पाटील यांचे अभिनंदन. आता फक्त आरक्षण मिळायचे बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी एक्स या समाजमाध्यमावरून दिली आहे.
मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना अधिसूचनेची प्रत दिली आणि जरांगे- पाटील यांनी आंदोलन थांबवले. मराठा समाजाने राज्यभरात एकच जल्लोष केला. त्यानंतर राज ठाकरे यांनी एक्सवरून प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे-पाटील यांचे अभिनंदन तर केलेच पण टोलाही लगावला आहे.
राज्य सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. आता फक्त आरक्षण मिळायचे बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, म्हणजे आपल्या मराठा बांधवांना, भगिनींनाही खरी परिस्थिती समजेल. लोकसभा निवडणुकीआधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे-पाटील यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीतून आपल्या आंदोलनाला सुरुवात केली होती. तेव्हा राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली होती. मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दर्शविला होता.