सिद्दीकी पिता-पुत्र अजित पवार गटात ? झिशान सिद्दीकी यांनी पक्षांतराचे वृत्त फेटाळले..

24 प्राईम न्यूज 3 फेब्रु 2024
मुंबईतील काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी तसेच त्यांचे चिरंजीव आमदार झिशान सिद्दीकी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे, मात्र काँग्रेस सोडून कोणत्याही पक्षात जाण्याचा माझा विचार नाही, असे स्पष्ट करीत झिशान सिद्दीकी यांनी पक्षांतराचे वृत्त फेटाळले आहे. त्याचवेळी वडिलांबद्दल मी काही बोलू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.
बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोघेही अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. १० फेब्रुवारी रोजी दोघांचा अजित पवार गटात प्रवेश होणार असल्याचे बोलले जाते. या चर्चेवर स्पष्टीकरण देताना झिशान म्हणाले की, मी कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाही. मी काँग्रेसमध्येच आहे. मी आणि माझ्या वडिलांनी नुकतीच अजित पवार यांची भेट घेतली. त्या भेटीबाबतचे वृत्त खरे आहे. आमचे कौटुंबिक नाते आहे. त्यामुळे आम्ही अधूनमधून भेटत असतो. ती काही राजकीय भेट नव्हती.