मुंबईत ६ ठिकाणी बॉम्बस्फोट होण्याच्या धमकीने खळबळ

24 प्राईम न्यूज 3 फेब्रु 2024
मुंबई शहरात ६ ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याचा धमकीचा मेसेज मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली. या धमकीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. दरम्यान, धमकीचा मेसेज देणाऱ्या व्यक्तीच्या अटकेसाठी गुन्हे शाखेसह एटीएसने विशेष मोहीम हाती घेतली आहे. गेल्या काही दिवसांत बॉम्बस्फोट होणार असल्याच्या निनावी कॉल्स आणि मेसेजेसमुळे मुंबई पोलिसांवर प्रचंड ताण येत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. गुरुवारी रात्री वरळी येथील वाहतूक पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला एका व्हॉट्सअॅप क्रमांकावरून एक मेसेज प्राप्त झाला. त्यात आम्ही मुंबई शहरात ६ ठिकाणी बॉम्ब ठेवले असून या बॉम्बचा कुठल्याही क्षणी स्फोट होईल, असे नमूद करण्यात आले होते, मात्र ६ बॉम्बस्फोट कुठे आणि कधी होणार आहेत याबाबत काहीच माहिती देण्यात आली नाही.