छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर..

24 प्राईम न्यूज 3 फेब्रु 2024 राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. दमानिया यांनी यासंदर्भात शुक्रवारी
एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट केली. या पोस्टची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. छगन भुजबळ यांनी मात्र दमानिया यांचा हा दावा खोडून काढला आहे. नवीन काही आता मला पाहिजे असे काही नाही. असा काही प्रस्ताव मला आला नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.
भुजबळ भाजपच्या वाटेवर? एकेकाळी भज बळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्टमाणसांना मोठं करणार, राजकारणासाठी ? कुठे फेडाल हे पाप, असे दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेनुसार ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला मंत्रिपदावर असूनही छगन भुजबळ यांनी उघड विरोध केला आहे. याशिवाय भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास विरोध केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या विरोधात असंसदीय भाषा वापरली. त्यामुळे भुजबळ ओबीसी मुद्द्यावर आरक्षणाच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडतील, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर दमानिया यांची पोस्ट चर्चेत आली आहे.
दरम्यान, मला कुठल्या पदाची हौस नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मी ओबीसींसाठी काम करत आहे. नवीन काही आता मला पाहिजे असे काही नाही.