निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शरद पवारांचे सुप्रीम कोर्टात आव्हान..

24 प्राईम न्यूज 14 Feb 2024. राष्ट्रवादी काँग्रेस’ व ‘घड्याळ’ हे पक्षनाव आणि निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला बहाल करण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. केवळ विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर पक्षावर हक्क सांगता येत नसल्याचा दावा शरद पवार गटाने केला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने ६ फेब्रुवारी रोजी अजित पवार गट हाच मूळ ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ असल्याचा निर्णय दिला होता. पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘घड्याळ’ व पक्ष या दोन्हींवर संस्थापक शरद पवार यांचा हक्क राहणार नसल्याचे आयोगाने निकालपत्रात स्पष्ट केले होते. विधिमंडळ पक्षात अजित पवार गटाला बहुमत असल्याचे कारण देत आयोगाने निकाल दिला होता.
आयोगाने शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार’ हे नवे पक्षनाव बहाल केले असून राज्यसभेत या पक्षनावाने उमेदवार उभे करण्याची मुभा दिली आहे. शरद पवार गटाने आयोगाच्या निकालाला आव्हान दिले असले तरी, अजित पवार गटाने यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल केले होते. त्यामुळे अजित पवार गटाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाला आव्हान याचिकेवर निर्णय द्यावा लागेल.