दिल्लीवारीनंतरही तिढा कायम जागावाटपात शिवसेना, राष्ट्रवादीच्या पदरी निराशाच.

24 प्राईम न्यूज 10 Mar 2024. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दिल्लीवारी झाल्यानंतरहीं अद्याप निराशा कायम आहे. शुक्रवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बंगल्यावर उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत जागावाटपाचा तिढा सुटला नसल्याचे समजते.
आमचीच खरी शिवसेना असे मुख्यमंत्री शिंदे आणि आमचीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असे अजित पवार सांगत असले तरी जागावाटपामध्ये त्यांचे काहीच खरे नाही असे समोर येत असलेल्या माहितीवरून तरी दिसते. शिवसेनेने ज्या जागा लढवल्या आहेत, त्या जागांवर शिवसेनेचाच दावा आहे, अशी भूमिका शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतली आहे, तर शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच जागा आम्हालाही हव्यात, असा आग्रह अजित पवार गटाचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी धरला आहे. लोकसभेच्या जागांचा फॉर्म्युला हा चर्चेनंत्रच ठरेल, पण जो पक्ष ज्या जागा लढला त्याला साधारणपणे त्या जागा जाव्यात हे त्याचे सूत्र असते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. याशिवाय भाजप २६ आणि शिवसेना- राष्ट्रवादी मिळून २२ जागा असा फॉर्म्युला असेल, असा फॉर्म्युलाही फडणवीस यांनी सागितला होता. प्रत्यक्षात मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच अमित शहा यांच्या निवासस्थानी मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या बैठकीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार तोंडावर आपटल्याचे सांगण्यात येते. भाजप ३६ जागांसाठी आग्रही आहे, तर उर्वरित १२ जागांसाठी शिवसेना ८ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागांची ऑफर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यातही तिढा कायम राहिला तर भाजप जास्तीत जास्त ४ जागांवर तडजोड करू शकतो, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यानुसार शिंदे गटाला १० ते १२ जागा मिळू शकतात किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला ६ जागा मिळतील.सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २५, तर शिवसेनेने २३ जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यावेळी भाजपने २३, तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने १९ पैकी ४ जागा जिंकल्या होत्या. यावरच घोडे अडले आहे. त्याचा विचार करता आपल्यावर अन्याय झाल्याची भावना शिवसेनेत निर्माण होऊ शकते. कारण राष्ट्रवादीचे ४ खासदार असताना त्यांना तेवढ्याच जागा मिळतील आणि शिवसेनेकडे १३ खासदार असतानाही केवळ ८ आणि जास्तीत जास्त १२ जागा मिळतील, असे सांगण्यात येते.