अजितदादांनी पक्ष फोडताच माझ्याविरोधात कारवाईला वेग. -लोकसभेआधी मला तुरुंगात् टाकतील, रोहित पवारांचा आरोप.

24 प्राईम न्यूज 11 Mar 2024
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालया (ईडी) ने ८ मार्च रोजी बारामती अॅग्रो लि.च्या ताब्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड सहकारी साखर कारखान्यावर टाच आणली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार बारामती अॅग्रो लि.चे संचालक आहेत. या कारवाईमुळे रोहित पवार अडचणीत आल्याचे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. कोणत्याही एफआयआरमध्ये माझे आणि बारामती अॅग्रोचे नाव नाही. २ वर्षे ईडीने कारवाई केली नाही. १९ जानेवारीला मला नोटीस आली आणि ईओडब्ल्यूने २० जानेवारीला क्लोजर रिपोर्ट दाखल केला. त्यात क्लीन चिट देण्यात आली आहेत्यामुळे केवळ राजकीय द्वेषातून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. अजित पवार पक्ष फोडून, पक्ष चोरी करून सत्तेत गेले, पण मी लोकांसाठी सरकारशी संघर्ष करत असल्याने माझ्यावरील कारवाईने वेग घेतल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. सोबतच लोकसभा निवडणुकीआधी मला २-३ महिने तुरुंगात टाकले जाऊ शकते. काही लोकांनी स्वाभिमान गहाण ठेवला असला, तरी मी संघर्ष करत राहणार आहे, असा दावाही रोहित पवार यांनी केला.
रोहित पवार पुढे म्हणाले की, आम्ही लिलाव प्रक्रियेतून नियमानुसार साखर कारखाना ताब्यात घेतला. या व्यवहारात काहीही नियमबाह्य झालेले नाही. आम्ही सगळी माहिती ईडीला दिलेली आहे. आमच्यावर ठेवलेले आरोप पीएमएलएमध्ये बसत नाहीत. बारामती अॅग्रोमध्ये काळा पैसा नाही, घामाचा पैसा आहे. अजूनपर्यंत जप्तीची नोटीस आमच्यापर्यंत पोहोचली नाही. जप्ती प्रतिकात्मक जप्ती असते. बाजू मांडण्यासाठी १८० दिवस दिले जातात.
बारामती अॅग्रो लि. ही कंपनी १९८८ रोजी माझे आजोबा आप्पासाहेब पवार यांनी सुरू केली. २००० च्या आसपास माझ्या वडिलांनी कंपनीत लक्ष द्यायला सुरुवात केली. २००७ पासून मी या कंपनीकडे लक्ष देत आहे. या कंपनीत ८ हजार ५०० कर्मचारी सध्या काम करत आहेत. असंख्य शेतकरी, कॉन्ट्रॅक्ट वर्कर आणि या सर्वांचे कुटुंबीय अशा साडेतीन लाख लोकांशी तुम्ही खेळत आहात, असा आरोपही रोहित पवार यांनी केला.