अमळनेरात शासकीय ज्वारी खरेदी केंद्र सुरू करावेत – किसान काँग्रेसचे प्रांताधिकारी यांना निवेदन.



अमळनेर /प्रतिनिधी. अमळनेर तालुक्यात ह्या वर्षी रब्बी हंगामात भरघोस ज्वारीचे उत्पादन झाले आहे.मात्र शासकीय ज्वारी खरेदी केंद्राअभावी भाव कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याने अमळनेर मध्ये शासकीय ज्वारी खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी किसान काँग्रेस ने प्रांताधिकारी महादेव खेडकर यांना निवेदन देऊन केली आहे
निवेदनात म्हटले आहे की,तालुक्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.अशा परिस्थितीत देखील शेतकऱ्यांनी ज्वारीचे पीक घेतले.मात्र शासकीय खरेदी केंद्र नसतांना पडलेल्या भावात ज्वारी विकली जात आहे.बाजार समितीत ज्वारीला मिळत असलेला भाव व शासनाने जाहीर केलेला हमीभाव यात एक हजार रुपयांचा फरक पडत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.त्यामुळे शासकीय खरेदी केंद्र सुरू करून ज्वारी हमीभावाने खरेदी करण्याची मागणी किसान काँग्रेस ने प्रांताधिकारी महादेव खेडकर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.यावेळी तालुकाध्यक्ष दिनेश पवार, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. सुभाष पाटील,जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील,बाजार समिती संचालक डॉ.अनिल शिंदे,शहराध्यक्ष समाधान कँखरे,सुनिल पाटील,शरद पाटील,योगेश पवार,प्रथमेश सोनार,प्रभाकर धनगर आदी उपस्थित होते.
