आर-पार दर्शक जुन्या-पुरान्या वापरलेल्या साड्या वाटून आमच्या आया-बहिणींची अब्रू काढता याची किंमत येत्या निवडणुकीत तुम्हाला चुकवावीच लागेल ! -आम्ही गरीब आहोत ! म्हणजे लाचार आणि भिकारी नाही ! गरीबांची माफी मागा ! -विकासपुरूष, कार्यसम्राट, भाजपाचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांचे पत्रकार परिषदेत आवाहन !

धुळे/प्रतिनिधी

देशातील सत्तारूढ भाजप व त्यांचे नेते दिवसरात्र ढोल पिटून आम्ही ८० कोटी लोकांना फुकट खाऊ घालतो, असा देशभर डांगोरा पिटत आहेत. तर दिल्लीच्या सत्तेतील भाजप नेते, ५ किलो तांदूळ व ३ किलो गहू ज्याची शासकीय किंमत केवळ ९० रूपये होते, ते दरमहिन्याला विनामूल्य देण्याचे श्रेय लाटत आहेत. त्याचवेळेला देशाच्या धान्य कोठारात क्षणाक्षणाला भर टाकू अन्नधान्याच् गचया बाबतीत देशाला ज्या शेतकऱ्यांनी कष्ट करून, घाम गाळून स्वंयपूर्ण केले. शेतकऱ्याला शेती परवडू नये, अशी व्यवस्था केंदातीलसत्ताधारी अंमलात आणीत आहेत. म्हणजे, शेतकरी लवकरात लवकर भूमीहीन होवून शेतकरी स्वतःच्याच शेतात शेतमजूर झाला पाहिजे, सरकारच्या फुकट धान्य योजनेचा लाभार्थी झाला पाहिजे, या कार्यक्रमाची बेमालूमपणे अंमलबजावणी करीत आहेत. गरीब कुटूंब प्रमुख मुला-बाळांना जन्म देवू शकते, पण आपल्या बायकोला, बहिणीला, आईला एक साडी घेवू शकत नाही. भारताच्या गरीबीची अशी जगभर बदनामी करून मोफत साड्या वाटण्याच्या योजनेचा निर्लज्ज प्रचार करीत आहेत. कुठल्याही देशांतील गरीबांची अब्रू घालविणारीच ही कल्पना आहे. ८० कोटी लोकांना आम्ही मोफत धान्य वाटप करतो. अशी टिमकी वाजवणे हे भाजपच्या सलग १० वर्षातील कामकाजाची आणि गरीबांविरूध्द अंमलात आणलेल्या कार्यक्रमाची स्पष्ट कबूली आहे. पंतप्रधान सन्मान योजनेखाली गरीब शेतमजूरांना सहा हजार रूपये वर्षाला त्याच्या खात्यात जमा केले जातात. याचा अर्थ दररोज १६ रूपये ४४ पैसेसन्मान वेतन म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. दारूच्या दुकानापुढे बसणारा भिकारी सुध्दा या पेक्षा जास्त कमवतो. भीक मागूनही जास्त पैसे मिळतात. मग यात कसला आला सन्मान ? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी म्हटले आहे की, ‘२०१४ मध्ये सोयाबीन ४ हजार रूपये होते, आज ३.५०० रूपये आहे. कापूस ८ हजार रूपये होता आज ७.८०० रूपये आहे. दुबई मध्ये कांदा २९० रूपये किलो आहे. पण निर्यातदार शेतकऱ्यांना फक्त ४० रूपये मिळतात. परदेशातून पिवळे वाटाणे, तूर आयात करून हरभऱ्याचे भाव पाडले.शेतकऱ्यांना टमाटाचे बरे भाव मिळाले तर, दहा लाख टन टमाटे नेपाळ मधून आयात केले. शत्रू राष्ट्रातील शेतकरी श्रीमंत करून देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावले जात आहे.

केंद्रातील भाजप सरकारने, ‘गरीब कुटूंब प्रमुख आपल्या बायकोला, आईला व बहिणीला एक साडी सुध्दा घेवू शकत नाही, यासाठी रेशन दुकानातून वाटप केलेल्या साड्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या आहेत. तसेच, फाटक्या थिगळ लावलेल्या जुन्या-पुरान्या आहेत. एवढेच नव्हे तर, अत्यंत पारदर्शक असून आरपार दर्शक आहेत. अशा साड्या म्हणजे, आमच्या आया-बहिणींची अब्रू चव्हाट्यावर टांगल्या सारखे आहे. वाटपासाठी आणलेल्या साड्या एवढ्या चांगल्या दर्जाच्या आहेत. असा दावा आजपर्यंत एकाही भाजपा नेत्याने केलेला नाही. याचा अर्थ स्वच्छ आहे की, सदर पारदर्शक साड्या वाटून दारिद्र्य रेषेखालील राहणाऱ्या आदिवासी, दलित तसेच गरीबांच्या अब्रूचे सार्वजनिक धिडंवंडे काढण्याचा प्रकार आहे’. अशी अत्यंत विखारी टिका करून लोकसंग्रामचे नेते अनिल अण्णा आपल्या पत्रकात पुढे म्हणतात की, ‘भाजपाच्या देशातल्या सर्वोच्च नेत्यापासून सर्वांना माझी अत्यंत कळकळीची विनंती आहे की, गरीबांना वाटलेल्या या साड्या नेसून भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्यांसह गावोगावी मते मागण्यासाठी फिरणाऱ्या भाजपा महिलांना आमच्या ग्रामीण भागात प्रचारासाठी पाठवा. याचा भाजपाला दुहेरी फायदा होईल. साड्यांचा आपोआप प्रचार होईल. साड्यांवर होणारी टिका आपोआप बंद होईल. भारतीय जनता पक्षाचा एक हितचिंतक म्हणून माझी विनंती मान्य करावी, असे आवाहन पत्रकात अनिल अण्णांनी केले आहे.
आपल्या पत्रकात अनिल अण्णा पुढे म्हणतात की, आम्ही गरीब आहोत, याचा अर्थ भाजपमधील लब्ध प्रतिष्ठीत उच्चवर्णीय नेत्यांनी आम्हांला लाचार आणि भिकारी समजण्याचे काही कारण नाही. आम्ही आमच्या आत्मसन्मानाचे रक्षण करण्यासाठी पुरेसे सक्षम आहोत. हे तुम्हाला येत्या निवडणुकीत आम्ही दाखवून देवू ! एवढीच सूचना आता पुरती पुरेशी आहे. असे ही पत्रकात अनिल अण्णांनी शेवटी म्हटले आहे.
