केवळ मोदींसाठी मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा. -राज ठाकरे.


24 प्राईम न्यूज 10 Apr 2024. आगामी लोकसभा देशाचे भविष्य ठरवणारी आहे. आज देशाला खंबीर नेतृत्वाची गरज असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला पाठिंबा देत असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी केली. लोकसभेची सलग तिसरी निवडणूक न लढवता थेट विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिले. राज ठाकरे यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर मनसे महायुतीत सहभागी होईल, अशी चर्चा सुरू झाली होती. मनसेला दक्षिण मुंबई लोकसभेची जागा मिळेल, असे बोलले जात होते. या चर्चाना राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर आयोजित गुढीपाडवा मेळाव्यात पूर्णविराम दिला.
भाजपकडून त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव होता, मात्र रेल्वे इंजिन हे निवडणूक चिन्ह कष्टाने कमावलेले असल्याने त्यावर तडजोड नाही, असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले. भाजपने राज्यसभा आणि विधान परिषद देऊ केली होती, मात्र हे प्रस्ताव फेटाळून बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
