करणखेडे येथे गॅस लिक झाल्याने तीन घरांना आग लागून दोन कुटुंब बेघर.

0

अमळनेर /प्रतिनिधी. तालुक्यातील करणखेडे येथे गॅस लिक झाल्याने तीन घरांना आग लागून दोन कुटुंब बेघर झाल्याची घटना १० रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास घडली
बापू राजधर धनगर यांच्या पत्नी सकाळी साडे दहा वाजता स्वयंपाक कत असतांना भाकरी करण्यासाठी गॅस पेटवताच अचानक आग लागली. त्या ओरडत घराबाहेर पडल्या. आजूबाजूचे नागरिक धावत आले मात्र तोपर्यंत संपूर्ण घराणे पेट घेतला होता. ग्रामस्थ हातात हंडे ,बादल्या घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न करीत होते मात्र आग आटोक्यात येत नव्हती. घराला लाकडी छत असल्याने लवकर पेट घेतला होता. काही ग्रामस्थांनी शेजारील घराना आग लागू नये म्हणून धाब्यावर जाऊन खोदण्यास सुरुवात केली. तोपर्यन्त आसाराम राजधर धनगर यांच्याही घराला आग लागली. बाजूच्या सुनील आत्मराम गुरव यांच्याही घराला आग लागली. सामाजिक कार्यकर्ते शरद धनगर यांनी ताबडतोब नगरपरिषदेला फोन करून आगीचे वृत्त कळवताच मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी अग्निशमन बंब करणखेडा येथे पाठवला. अग्निशमन दल प्रमुख दिनेश बिऱ्हाडे ,वाहन चालक फारुख शेख,फायरमन मच्छिन्द्र चौधरी, वासिम पठाण यांनी आग विझवली. बापू धनगर व आसाराम धनगर यांच्या घरातील कपडे , फ्रीज ,टीव्ही ,घरगुती साहित्य सारे काही जाळून खाक झाले. घराचे धाबे खोदल्याने त्यांना राहायला जागा देखील राहिलेली नाही. तसेच सुनील आत्मराम गुरव यांनी त्यांचे घर स्वस्त धान्य दुकानदाराला धान्य ठेवण्यासाठी दिले होते. त्याही घराला आग लागल्याने सर्व धान्य जळून खाक झाले.
मंडळाधिकारी सुरेश चौधरी ,तलाठी संगीता भोसले यांनी नुकसानीचा पंचनामा केला. गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी देखील भेट देऊन पाहणी केली. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्याशी संपर्क साधून आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी आचारसंहितेची अडचण येत नसल्याने उध्वस्त कुटुंबांना तातडीने घरकुल मंजूर करावे आणि एक महिन्याचा किराणा द्यावा असे निर्देश दिले. तिन्ही घर मिळून सुमारे तेरा लाखाचे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!