मोदींच्या जिरेटोपावरून नव्या वादाला तोंड छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याची शिवभक्तांची प्रतिक्रिया.

24 प्राईम न्यूज 16 May 2024.. वाराणसी येथून नामांकन दाखल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी मोदी यांच्या डोक्यावर घातलेल्या जिरेटोपावरून आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जनमानसातील प्रतिमेशी घट्ट बांधल्या गेलेल्या जिरेटोपाविषयी काही संकेतही दृढ आहेत. असे असताना मोदी यांना जिरेटोप घातल्याबद्दल शिवभक्तांमधून पटेल यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यावरून राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागताच भाजप आणि शिवसेना शिंदेगटाने सारवासारव केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वाराणसी येथून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटकपक्षांचे प्रमुख नेते तसेच भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रफुल पटेल यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. मोदी यांनी अर्ज दाखल केल्यानंतर या सर्वच नेत्यांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या. त्यावेळी पटेल यांनी मोदी यांच्या डोक्यावर जिरेटोप घातला. या प्रसंगाची चित्रफित समाजमाध्यमांवरून प्रसारित होताच महाराष्ट्रातून त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणीही जिरेटोप परिधान करू नये, असा संकेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांच्या अभिनय करतानाही संपूर्ण वेशभूषा परिधान केल्यानंतर जिरेटोप परिधान करण्याचा प्रघात आहे. पंतप्रधान मोदी हे छत्रपती नाहीत. केवळ छत्रपती हा जिरेटोप परिधान करु शकतात. जिरेटोपाचा अवमान करण्यात येऊ नये,’ असा इशारा संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी दिला. मोदी यांची मर्जी संपादन करण्यासाठी राज्यातील नेते किती लाचार होत आहेत, हे यावरून दिसून येते, अशी टीकाही त्यांनी केली