जळगाव स्मिता वाघ, तर रावेरला रक्षा खडसे विजयी.

अमळनेर/प्रतिनिधी. रावेर आणि जळगावची जागा राखण्यात भाजपला यश आले आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार रक्षा खडसे या विजयी होत त्यांनी आपल्या या यशाची हॅटट्रिक पूर्ण केली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांचा २ लाख ७१ हजारांची आघाडी घेत पराभव केला, तर जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या स्मिता वाघ यांनी शिवसेना उबाठाचे उमेदवार करण पवार यांचा २ लाख ४७ हजार मतांच्या फरकाने पराभव केला. जळगाव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापत ते स्मिता वाघ यांना देण्यात आले होते. उन्मेष पाटील हे पक्षीय राजकारणाचा बळी ठरले होते. त्यामुळे त्यांनी भाजपची साथ सोडत शिवसेना उबाठाला जवळ केले. त्यांना तिकीट देऊ केले असता, त्यांनी ते नाकारत करण पवार यांना दिले आणि करण पवार चर्चेत आले. उबाठाच्या नाराज शिवसैनिकांची त्यांना चांगली साथ मिळेल. तसेच महाविकास आघाडी देखील साथ देईल, अशी अपेक्षा असतांना तसे घडले नाही. स्मिता वाघ यांना६ लाख ६२ हजार ५७९ मते तर करण पवार यांना ४ लाख १५ हजार ४६५ मते मिळालीत.