मी माझ्या हाताने माझेच पाय धुतले. -नाना पटोले.

24 प्राईम न्यूज 19 Jun 2024. माझ्याबद्दलचा एक व्हिडिओ दाखवून मला जाणीवपूर्वक बदनाम केले जात असून त्यात फारसे तथ्य नाही. अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना संत गजानन महाराजांची पालखी तेथे आली. मी वारकरी संप्रदायाचा असून गजानन महाराजांचे दर्शन घेण्यास गेलो असताना चिखलाने पाय माखले. एका कार्यकर्त्याने पायावर पाणी टाकले आणि मी माझ्या हाताने माझे पाय धुतले, यात गैर काय आहे? मी शेतकरी माणूस आहे. मला चिखलाची सवय आहे, जे काही झाले ते दिवसाच्या स्वच्छ प्रकाशात झाले आहे. त्यात लपवण्यासारखे काहीच नाही. काँग्रेस पक्षाला लोकसभेत मिळालेल्या यशाने विरोधकांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे अशा प्रकारे कारस्थाने करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी येथे केला. नाना पटोले गाडीत बसले असून त्यांचे पाय कार्यकर्ता धूत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून पटोले यांच्यावर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर पटोले यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत घडलेल्या घटनेचा खुलासा केला. ज्या लोकांचे पाय ईडी कारवायात माखलेले आहेत, ते रात्रीच्या अंधारात ज्यांचे पाय धुतात, पाय चेपून देतात त्यांच्याबद्दल काही तरी बोलले पाहिजे आणि तेही दाखवले पाहिजे, असेही पटोले म्हणाले.