कैसर खालिद निलंबित -घाटकोपर होर्डिंगप्रकरणी हलगर्जीपणा केल्याचा ठपका.

24 प्राईम न्यूज 26 Jun 2024.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात मंगळवारी गृह विभागाने अतिरिक्त पोलीस महासंचालक खालिद कैसर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. प्रशासकीय त्रुटीसह होर्डिंग मंजूर करताना अनियमितता, पोलीस महासंचालक कार्यालयाच्या मंजुरीशिवाय मोठ्या प्रमाणात होर्डिंगला परवानगी देऊन कामात हलगर्जीपणा केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. १३ मे २०२४ रोजीच्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले होते. या गुन्ह्याचा तपास सध्या एसआयटीकडे असून या पथकाने आतापर्यंत या कटातील मुख्य आरोपी इगो मीडियाचा संचालक भावेश भिंडे, माजी संचालिका जान्हवी मराठे – सोनलकर आणि होडिंग उभारणारा कंत्राटदार सागर कुंभारे यांना अटक केली होती. ते तिघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या संपूर्ण प्रकरणात खालिद कैसर यांचे नाव समौर आले होते. खालिद कैसर यांच्या पत्नीच्या कंपनीला काही संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्यावर झाला.
खालिद कैसर यांचे नाव समोर आल्याने त्यांची एसआयटीने स्वतंत्रपणे चौकशी सुरू केली आहे. कोसळलेल्या होर्डिंगला मंजुरी देताना एकूण अनियमितता आणि प्रशासकीय त्रुटी दिसून आल्या होत्या. होर्डिंगला मंजुरी देताना राज्य पोलीस महासंचालक कार्यालयाची मंजुरी घेण्यात आली नव्हती.या संपूर्ण प्रकरणात हलगर्जीपणा झाल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्यामुळे मंगळवारी खालिद कैसर यांच्यावर गृह विभागाने निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान त्यांना निर्वाह, महागाई आणि इतर भत्ते दिले जाणार आहेत. या कालावधीत त्यांना इतर कुठलाही व्यवहार किंवा रोजगार करता येणार नाही. त्यांना राज्य पोलीस महासंचालकांच्या परवानगीशिवाय कार्यालय सोडता येणार नाही. निलंबन काळात त्यांच्याकडून कुठलेही गैरवर्तन होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेण्यात घ्यावी, असे त्यांच्या निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे.