वाहन चालवताना शिंक आल्याने वाहनावरील ताबा सुटल्याने कार झाडावर धडकली.

अमळनेर/प्रतिनिधि. अमळनेर येथून शिंदखेडा कडे कारने जात असताना चालकास शिंक आल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटून कार झाडावर आदळल्याने एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाल्याची घटना दि 27 रोजी दुपारच्या सुमारास एकलहरे गावाजवळ घडली.अमळनेर येथील पारस गोल्ड सराफी पेढीचे मालक संदीप थोरात हे खाजगी कामानिमित्त मांझा कारने आपली पत्नी, आई व वहिनी सह शिंदखेडा जात असताना एकलहरे गाव सोडल्यानंतर वळणावर त्यांना अचानक शिंक आल्याने त्यांचा वाहनावरील ताबा सुटून लिंबाच्या झाडावर गाडी जोरदार धडकली. या अपघातात गाडीचा पुढील भाग संपूर्ण चक्का चुर होऊन संदीप थोरात यांना किरकोळ मार बसला मात्र त्यांच्या आईला गुडघ्याला जबर मार बसून पत्नीचा हात तर वहिनीचा पाय फॅक्चर झाला. घटनेनंतर आईला नाशिक हलविण्यात आले तर उर्वरित तिघांवर अमळनेर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर गाडीची एकंदरीत परिस्थिती पाहता मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे.