■ पोलीस भरतीसाठी गेलेल्या अमळनेरातील तरुणाचा मुंबईत दुर्दैवी मृत्यू…. डेड बॉडी अमळनेर तहसील कार्यालय समोर विद्यार्थी व बिऱ्हाडे याचे नातेवाईकांची गर्दी


अमळनेर/प्रतिनिधी. करिअर करण्याच्या उद्देशाने पोलिसात भरती होण्यासाठी तो मुंबईत गेला,तेथे पात्र ठरण्यासाठी खूप धावलाही मात्र अचानक कोसळल्यावर त्याला रुग्णालयात नेले असता पुन्हा त्याला हृदय विकाराचा जोरदार झटका येऊन अमळनेर येथील होतकरू तरुण जीवानिशी गेल्याची दुर्देवी घटना काल दि 29 रोजी दुपारच्या सुमारास घडली.
अक्षय मिलिंद बिऱ्हाडे,वय 22 वर्ष असे या मयत तरुणाचे नाव असून अमळनेर येथील प्रबुद्ध कॉलनीतील तो रहिवासी होता.मुंबईत बाडेगाव येथे पोलीस भरती असल्याने त्यासाठी तो गेला होता,सुरवातीला मैदानी चाचणी साठी 5 की मी धावावे लागणार असल्याने तो मैदानात उतरला आणि मोठ्या जिद्दीने धावू लागला मात्र साडेचार किमी अंतर धावल्यानंतर केवळ 500 मीटर बाकी असताना अचानक तो खाली कोसळून बेशुद्ध झाल्याने त्याला तातडीने उचलून कळवा येथे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.दोन तासांनी तो शुद्धीवर ही येऊन त्याला बरेही वाटू लागले मात्र पुन्हा घात होऊन त्याला हृदयाचा जोरदार झटका आल्याने त्याची प्राणज्योत मालवली. या दुःखद घटनेने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून आईवडिलांचा एकुलता एक आधार हिरावून नेला आहे.वडील आजारी आणि बहिणीचे लग्न झालेले आणि अक्षय हा एकटा त्यामुळे गेल्या गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसात भरती होण्याचे स्वप्न पाहुन प्रचंड मेहनत तो घेत होता,यावेळी भरती होणारच अशी जिद्द त्याची होती मात्र दुर्देवाने स्वप्न अधुरे सोडून तोच जीवानिशी गेल्याने अमळनेर येथे सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे.
त्याचे मुंबईत शवविच्छेदन करून आज सकाळी मृतदेह अमळनेर येथे आणण्यात येणार आहे.त्याच्या पश्यात आईवडील, एक बहीण, काका असा परिवार असून मिलिंद बिऱ्हाडे यांचा तो मुलगा तर नगरपालिका अग्निशमन विभागाचे फायरमन दिनेश बिऱ्हाडे यांचा तो पुतण्या होता.