सरकारी कर्मचाऱ्यांना ४ टक्के वाढीव डीए. राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा.

24 प्राईम न्यूज 11 Jul 2024.
मुंबई। राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ केली आहे. सध्याचा महागाई भत्त्याचा दर ४६ टक्के आहे. आता या निर्णयामुळे महागाई भत्त्याचा दर ५० टक्के होणार आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबरोबर इतर महत्त्वाच्या मागण्यांसंदर्भात मागील महिन्यात मुख्य सचिवांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दोन स्वतंत्र बैठका झाल्या होत्या. सदर बैठकांमध्ये केंद्राप्रमाणे १ जानेवारी २०२४ पासून ४ टक्के महागाई भत्ता वाढ थकबाकीसह मंजूर करण्याची आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने केली होती. त्यावर त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश मुख्य सचिवांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १ जानेवारी २०२४ पासून ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही वाढ जानेवारी ते जून या ६ महिन्यांच्या थकबाकीसह जुलै महिन्याच्या वेतनात रोखीने मिळणार आहे