पीक विमा योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ.

24 प्राईम न्यूज 16 Jul 2024. पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची अंतिम मुदत १५ जुलै रोजी संपत असताना या योजनेला आता ३१ जुलै २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी यासंदर्भातील माहिती दिली. राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही काही कारणामुळे पीक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी यासाठी योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती.
सध्या राज्यात विविध योजनांसाठी लाभार्थीची सेवा केंद्रांवर गर्दी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज आणि लागणारी कागदपत्रे जोडताना सव्र्व्हरची गती मंद झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित आहेत. परिणामी पीक विम्याचा अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी यासाठी राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने केंद्र सरकारला पत्रव्यवहार करण्यात आला होता. तसेच स्वतः धनंजय मुंडे याबाबत पाठपुरावा करीत होते. केंद्र सरकारने राज्याची विनंती मान्य करीत पीक विमा योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली. शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढवून दिल्याबद्दल मुंडे यांनी एक्स या समाजमाध्यमातून केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे आभार मानले आहेत.