मित्रपक्षांवर खैरात, महाराष्ट्राला ठेंगा. -आंध्र प्रदेशला १५ हजार कोटी, बिहारला २६ हजार कोटींची मदत. -लाडक्या महाराष्ट्राला अवघ्या ७,५४५ कोटी.

24 प्राईम न्यूज 24 Jul 2024. लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारचा पहिला आणि आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सादर केला. या अर्थसंकल्पातून सीतारामन यांनी प्रामुख्याने युवा, कृषी, शिक्षण, संरक्षण क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा केल्या. अर्थसंकल्पात शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी १.५२ लाख कोटी रुपयांची तरतूद करताना डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून कृषी विकासाचे लक्ष्य समोर ठेवण्यात आले आहे. आगामी ५ वर्षांच्या काळात ४.१ कोटी युवकांना रोजगार, कौशल्यविकास आणिइतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी २ लाख कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद केली आहे. एनडीएला भक्कम पाठिंबा देणाऱ्या आंध्र प्रदेश आणि बिहार राज्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पातून विशेष निधीच्या माध्यमातून कृपावर्षाव केला आहे. चंद्राबाबूंच्या आंध्र प्रदेशला १५ हजार कोटी रुपये, तर नितीश कुमारांच्या बिहारसाठी २६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या तुलनेत आतापर्यंत लाडक्या असलेल्या महाराष्ट्राची अवघ्या ७,५४५ कोटी रुपयांवर बोळवण करण्यात आली. आहे.