लाडक्या बहिणीला रक्षाबंधनदिनी भेट. – पहिल्या महिन्यासाठी १० हजार कोटींची केली तरतूद.

24 प्राईम न्यूज 24 Jul 2024. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात येत्या १९ ऑगस्ट रोजी म्हणजेच रक्षाबंधनदिनी प्रत्येकी १ हजार ५०० रुपये जमा करून त्यांना रक्षाबंधनाची पहिलीवहिली भेट दिली जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. पहिल्या महिन्यात सुमारे २ कोटी ५० लाख पात्र महिलांच्या नोंदणीचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्याचा सन २०२४-२५ वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आली. ही योजना महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरणारी आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने योजनेबाबत सादरीकरण करण्यात आले.