मंत्रिमंडळ बैठकीत दादा-भाऊ भिडले ! -निधी वाटपावरून अजित पवार, गिरीश महाजनांमध्ये खडाजंगी.

24 प्राईम न्यूज 24 Jul 2024. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षातील नेते आणि आमदार आपल्याला जास्तीत जास्त निधी कसा मिळेल या प्रयत्नात आहेत, मात्र याच निधीवाटपावरून आता सत्ताधारी पक्षातीलच तीव्र मतभेद समोर आले आहेत. मंत्रालयात मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निधीच्या मागणीचे पडसाद उमटले. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मंत्रिमंडळ बैठकीत आपल्या विभागाला २५:१५ योजनेसाठी अतिरिक्त निधी द्यावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. यावर पैसे कुठून आणू, आता काय जमीन विकायची का, असा संतप्त सवाल करीत पवार यांनी महाजन यांची मागणी फेटाळून लावल्याचे समजते. महाजन यांनीही त्यावर अजित पवारांना प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मतदारसंघातील एकास्मारकासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्याबाबतचा प्रस्ताव पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मांडला होता. हाच धागा पकडत नको तिथे खर्च नको अशी तुमची भूमिका असेल तर मग इथे खर्च कशाला, असा सवाल महाजन यांनी बैठकीत उपस्थित केल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्याच्या नुकत्याच सादर झालेल्या सन २०२४-२५च्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने लोकनुयायी घोषणा केल्या आहेत. या घोषणांच्या पूर्ततेसाठी सरकार जवळपास १ लाख कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. या खर्चाचा भार राज्याच्या तिजोरीवर पडला आहे. प्रसंगी या योजनांसाठी सरकारला कर्ज काढावे लागण्याची शक्यता असल्याने वित्त विभागाकडून सध्या नव्या प्रस्तावांना निधी देण्यास नकारघंटा वाजवली जात आहे.