डॉनला मंत्र्यांपेक्षा अधिक सुरक्षा . -गँगस्टर अबू सालेमची पुन्हा सेंट्रल जेलमध्ये रवानगी

24 प्राईम न्यूज 4 Aug 2024. कुख्यात गैंगस्टर अबू सालेमला शनिवारी (दि.३) दिल्ली येथून कर्नाटक एक्स्प्रेसने मनमाड आणि त्यानंतर वाहनाने नाशिकला आणण्यात आले. नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या अबू सालेमला दोन दिवसांपूर्वी दिल्लीत न्यायालयाच्या सुनावणीसाठी नेण्यात आले होते. मात्र, न्यायालयाने सुटीच्या कारणास्तव १० सप्टेंबरची तारीख दिल्याने सालेमला पोलीस, शहर पोलीस, रेल्वे सुरक्षा बल अशा कडक बंदोबस्तात माघारी आणण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, २००२ साली उद्योगपती अदानी यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकारणी सालेमविरुद्ध दिल्लीत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला कोर्टात हजर करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी अबू सालेमला दिल्लीला नेण्यात आले होते. मात्र, कोर्ट सुटीवर असल्यामुळे त्याला १० सप्टेंबरची तारीख देण्यात आली. ही तारीख मिळाल्यानंतर कर्नाटक एक्सप्रेसने पोलिसांनी त्याला मनमाडला आणले आणि येथून कडेकोट बंदोबस्तात वाहनाने नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले.
अबू सालेम हा कुख्यात डॉन असून, त्याच्या जीवाला इतर गुंडांपासून धोका असल्यामुळे त्याच्या सुरक्षेसाठी | कर्नाटक एक्सप्रेसमध्ये इंजिनपासून तिसरा डब्यापर्यंत प्रवाशांना मनाई करण्यात आली होती. या डब्यात अबू सालेम आणि त्याच्या सुरक्षेसाठी सुमारे ५० पेक्षा जास्त पोलीस आणि स्टेनगनधारी कमांडो तैनात होते. तर, रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलीस, शहर पोलीस आणि आरपीएफचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. कर्नाटक एक्सप्रेस प्लॅटफार्म क्रमांक ४ वर येताच पोलिसांनी अगोदर संपूर्ण डब्याला घेरले आणि त्यानंतर त्याच्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस, कमांडो सालेमला घेऊन खाली उतरले. सुरक्षेची बाब व इतर प्रवाशांचा विचार करत सालेमला लगेचच रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमध्ये नेण्यात आले. त्यानंतर कडेकोट बंदोबस्तात सालेमला घेऊन पोलीस वाहनाने घेऊन नाशिकच्या दिशेने रवाना झाले.