दंगलीतील खटल्यात तडजोडीची भूमिका घेत मा.आ. शिरीष चौधरींनी बदलली साक्ष…. -२०१६च्या नगरपालिका निवडणुकीत झाला होता वाद, अनेकांना मिळणार दिलासा…

अमळनेर /प्रतिनिधी. अमळनेर नगरपालिकेच्या २०१६ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी झालेल्या दंगलीतील खटल्यात तडजोडीची भूमिका घेत माजी आमदार शिरीष चौधरी न्यायालयात साक्ष बदलल्याने राजकीय नेत्यांमधील मनोमिलनाचे संकेत प्राप्त झाले आहेत. पुढील महिन्यात ६ रोजी खटल्याचा निकाल लागणार आहे. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आर के नगर भागात माजी आमदार शिरीष चौधरी आणि मंत्री अनिल पाटील यांच्यात भांडण झाले. त्यांनतर माजी आमदार साहेबराव पाटील, विद्यमान मंत्री अनिल पाटील माजी नगराध्यक्ष विनोद पाटील यांच्यासह ४० ते ५० जणांचा जमाव शिरीष चौधरी यांच्या घरावर चालून गेले. तलवार लाठ्या काठ्या, लोखंडी सळई दगड मारून गाड्या फोडल्या नुकसान केले असा आरोप करत शिरीष चौधरी यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. आरोपींमध्ये शहरातील प्रतिष्ठित व राजकीय लोक नगरसेवक राजेश पाटील, घनश्याम पाटील, माजी संचालक पराग पाटील स्व अनिल अंबर पाटील,संचालक पराग पाटील स्व अनिल अंबर पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख श्रीकांत पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती श्याम अहिरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन पाटील, नगरसेवक विक्रांत पाटील, प्रवीण साहेबराव पाटील, मनोहर पाटील आदि मान्यवरांचा समावेश होता. आठ वर्षांपासून हा खटला सुरू होता. ३ ऑगस्ट रोजी न्यायालयात याबाबत सुनावणी होती. न्यायालयात साक्ष देताना शिरीष चौधरी यांनी गर्दीत आरोपी ओळखू शकलो नाही म्हणून साक्ष दिली. पुढील सप्टेंबर महिन्याच्या ६ तारखेला या खटल्याचा निकाल लागणार आहे. शिरीष चौधरी यांच्यातर्फे ऍड सुरेश सोनवणे आणि आरोपींतर्फे ऍड यज्ञेश्वर पाटील यांनी काम पाहिले. या घटनेने अमळनेरच्या राजकारणात खळबळ माजली होती. मात्र आता मनोमिळनाचे संकेत प्राप्त झाल्याने शहरात समाधानी वातावरण निर्माण झाले आहे.