समाजात तेढ निर्माण कराल तर कारवाई करू. -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नितेश राणेंना अप्रत्यक्ष इशारा.

24 प्राईम न्यूज 13 Sep 2024. महायुतीतील नेते मागील काही दिवसांपासून सातत्याने दोन समाजांत तेढ निर्माण करणारी वक्तव्येकरीत आहेत. त्यातच मुस्लीम धर्मियांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्याविरोधात राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या वक्तव्याचा संदर्भ देत कोणीही कुठल्याही धर्माबाबत किंवा समाजाबाबत वाईट बोलता कामा नये, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या नेत्यांना दिला आहे. शिवाय कुठल्याही समाजघटकाविरुद्धची वक्तव्ये खपवून घेणार नाही. समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करू, असा अप्रत्यक्ष इशारादेखील अजित पवार यांनीनितेश राणेंना दिल्याचे म्हटले जात आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार जनसन्मान यात्रेतून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. गुरुवारी आळंदीतील कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, राजकीय पक्षातील एखाद दुसरी व्यक्ती एखाद्या समाजाबद्दल, एखाद्या घटकाबद्दल किंवा धर्माबद्दल वाईट बोलते तेव्हा त्याच्यामुळे समाजात दुही निर्माण होते. हे होता कामा नये. तुम्हाला तुमच्या विचारधारा मांडायच्या असतील तर तुम्ही मांडू शकता. तुम्हाला त्याचा अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे मत मांडायला हरकत नाही, परंतु तुम्ही वेगळ्या पद्धतीने बोलता आणि समाजामध्ये तेढ निर्माण करता. समाजात दुही निर्माण करता, जे समाजासाठी चांगले नाही.