धावत्या रेल्वेतून पडलेला मोबाईल रेल्वे पोलिसांनी शोधून प्रवाशाला केला परत.

आबिद शेख/अमळनेर
गोविंदा मिश्रा वय २८ रा अमरोली सुरत हे दि २ ऑक्टोबर रोजी ताप्ती गंगा एक्स्प्रेसने सुरतेहून प्रयागराज जात होते. गोविंदा याची चार वर्षांची भाची मोबाईल खेळत होती. अमळनेर येण्याच्या आधी तीन किमी अंतरावर तिच्या हातातून ४२ हजाराचा मोबाईल पडला. रेल्वे अमळनेर स्टेशनवर आली असताना गोविंदा उतरला व त्याने त्याच्या कुटुंबियांना पुढे रवाना केले आणि कर्तव्यावरील पोलीस हेमंत ठाकूर व विपीन कुमार याना भेटले. मात्र हे करत असताना त्याने खांबा क्रमांक सांगितला. त्यामुळे प्रवाश्यांला सोबत नेत दोन्ही पोलिसांनी रेल्वे ट्रॅक वर जाऊन मोबाईल शोधला आणि सन्मानाने प्रवाशाला परत केला. पोलिसांनी माणुसकी दाखवत वेळ काढून तीन किमी मागे जंगलात जाऊन मोबाईल शोधल्याबद्दल प्रवाश्याने जाहीर आभार मानले.