करारनाम्यांसाठी सामान्यांच्या खिशाला झळ ५०० रुपयांचेच स्टॅम्प पेपर यापुढे वैध.

24 प्राईम न्यूज 17 Oct 2024. खरेदी खत, हक्क सोडपत्र, प्रतिज्ञापत्र किंवा इतर करारनाम्यासाठी यापूर्वी १०० रुपये किंवा २०० रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प पेपर) वापरात होते. परंतु राज्यातील महायुती सरकारने १००-२०० रुपये किंमतीचे स्टॅम्प पेपर बाद करत या व्यवहारांसाठी ५०० रुपये मुल्याचे स्टॅम्प पेपर लागू केले आहेत. महाराष्ट्र मुद्रांक कायद्यातील सुधारणेचा अध्यादेश राज्यपालांनी सोमवारी जारी केला होता. या अध्यादेशाची अंमलबजावणी बुधवारपासून सुरू झाली आहे. त्यामुळे यापुढे कायदेशीर कागदपत्रे (लिगल डॉक्युमेंट्स) बनविण्यासाठी सर्वसामान्यांच्या खिशाला आणखीनच झळ बसणार आहे.
राज्य सरकारने महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, १९९८ मध्ये सुधारणा करून प्रतिज्ञापत्र, करारआणि कायदेशीर कागदपत्रांवरील मुद्रांक शुल्क ५०० रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मुद्रांक कायद्यातील सुधारणांमुळे राज्याला मुद्रांक शुल्क आणि नोंदणीतून सुमारे २ हजार कोटी रुपयांचा महसूल वाढण्यास मदत होईल, असे महसूल विभागाचे म्हणणे आहे. मुद्रांक शुल्क हा राज्य सरकारच्या महसुलाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे.
याआधी, खरेदीखत, हक्क सोडपत्र, नोटरी, बाँड-डीड आदी कायदेशीर व्यवहारांच्या नोंदणीसाठी १०० रुपये मुल्याचे मुद्रांक शुल्क वापरात होते. दरम्यानच्या काळात विविध योजना लागू केल्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.