आता ६० दिवस आधीच करा रेल्वेचे तिकीट बुक रेल्वेकडून तिकीट आरक्षण ४ महिन्यांवरून २ महिन्यांवर १ -नोव्हेंबरपासून तिकीट आरक्षणाचा नवा नियम होणार लागू..

24 प्राईम न्यूज 18 Oct 2024. सध्याच्या नियमानुसार रेल्वे प्रवाशांना किमान १२० दिवस आधी कुठल्याही ट्रेनचे तिकीट आरक्षित करता येते. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना दिलासा देण्यासाठी या नियमात बदल केला आहे. रेल्वे मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार आता आगाऊ तिकीट आरक्षित करण्याची मुदत १२० दिवसांवरून ६० दिवस (प्रवासाचा दिवस वगळता) करण्यात आली आहे. १ नोव्हेंबरपासून हा नवीन नियम लागू होणार आहे.भारतीय रेल्वेने एआरपी म्हणजेच अॅडव्हान्स्ड रिझर्व्हेशन पीरियड २ महिन्यांनी कमी केला आहे. रेल्वे बोर्डाचे संचालक (पॅसेंजर मार्केटिंग) संजय मुंचा यांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे. १ नोव्हेंबरपासून हा नवीन नियम लागू होणार असल्याने ३१ ऑक्टोबरपर्यंत झालेल्या आरक्षणावर याचा कोणताही परिणाम होणार नाही. ताज एक्स्प्रेस, गोमती एक्स्प्रेस इत्यादी दिवसा धावणाऱ्या रेल्वेगाड्यांवर या नियमाचा कोणताही परिणाम होणार नाही. या रेल्वेगाड्यांसाठी आरक्षित तिकिटाची सुविधा पूर्वीसारखीच राहील. याशिवाय परदेशी पर्यटकांच्या प्रवासावर या आदेशाचा कोणताही परिणाम होणार नाही. ते ३६५ दिवस आधीच तिकीट आरक्षित करू शकणार आहेत.